पिंपरी, ( प्रतिनिधी) – राज्यात होणार्या आगामी लोकसभा निवडणुकीत केवळ विकासकामांच्या जोरावर महायुतीचे 45 पेक्षाही अधिक उमेदवार निवडून येणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवडच्या वतीने (शहर-जिल्हा) निगडी येथे पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी खा. तटकरे बोलत होते. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार तटकरे यांनी शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सेल अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, फ्रंटल तसेच बूथ कमिटी यांच्या कामकाजाची पूर्ण माहिती घेतली. पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा अंतर्गत येणार्या सर्व एकूण बूथ, त्याची रचना याबाबत सविस्तर माहिती घेऊन सूचना दिल्या. यावेळी रुपाली चाकणकर आणि सुरज चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या सुरू असलेल्या तयारीचा सविस्तर आढावा सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षांनी यावेळी निवडणुकीच्या तयारीची सखोल माहिती दिली. तसेच विविध सेलच्या अध्यक्षांनी निवडणुकीच्या तयारीबाबतचा आढावा सादर केला.
या बैठकीस माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले, शाम लांडे, मोरेश्वर भोंडवे, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, संतोष बारणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, भोसरी विधानसभा पंकज भालेकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, मयूर कलाटे, संजय नेवाळे, राजू बनसोडे, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, संगीता नानी ताम्हाणे, विनया तापकीर, यश साने, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, राजेंद्र साळुंखे, प्रकाश सोमवंशी, प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, अरुण पवार, शिवाजी पाडूळे, यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवक, नगरसेविका व सेल अध्यक्ष तसेच विभाग प्रमुख, केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी निवडणुकांसाठी बूथनिहाय, मतदार याद्या, भाग याद्या यासंदर्भात तयारी सुरु आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहअसून तिन्ही विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अधिकाधिक मताधिक्याने निवडून येतील, मावळ आणि शिरूर मतदारसंघातील महायुतीचा कोणीही उमेदवार असला तरी त्याचे काम चांगल्या पद्धतीने करु, विजय आपलाच होणार. अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस