पुणे – पुणे रेल्वेस्टेशन परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या फोन कॉलमुळे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाची बुधवारी धांदल उडाली होती. मात्र, तपासणीनंतर ही अफवा असल्याचे समोर आले होते.
दरम्यान, निनावी फोन करणाऱ्या दोघांना रेल्वे आणि पुणे शहर पोलिसांनी वाघोली व रांजणगाव परिसरातून अटक केली. यातील आरोपीने मित्राच्या फोनवरून दारूच्या नशेत फोन केल्याची प्राथमिक माहिती आहे.
करण भिमाजी काळे (33, रा. नावरे, ता. शिरुर) व सुरज मंगतराम ठाकुर (30, रा.रांजणगाव एमआयडीसी, मु.रा.पंजाब) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघेही एका धर्माकोलच्या कंपनीत काम करतात. करण काळे याने दारुच्या नशेत सुरजच्या मोबाइलवरून कॉल केला असल्याची माहिती लोहमार्ग पुण्याचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर तपास करत आहे.