नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा. गो. वैद्य यांचं निधन झालं आहे. वयाच्या 97 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल ट्विट करुन माहिती दिली आहे. वैद्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुनंदा, तीन मुली, पाच मुलं असं कुटुंब आहे. मा. गो. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी निघणार आहे. नागपूरमधील अंबाझरी घाट या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वर्ष 1966 पासून मा. गो. वैद्य यांनी पत्रकारिता सुरु केली होती. अनेक उत्कृष्ट लेख, अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहणाऱ्या वैद्य यांना पत्रकारिता आणि समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारं सुगम संघ नावाचं हिंदी पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह रस्ते वाहतूक मंत्रीए नितीन गडकरी यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
वर्ष 1923 मध्ये वर्धा जिल्ह्यात तरोडा या गावी जन्म झालेले वैद्य वर्ष 1943 मध्ये संघकार्याशी जोडले गेले, ते अखेरपर्यंत. वर्ष 1948 मध्ये गांधी हत्त्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आल्यानंतरच्या काळात त्यांनी भूमीगत राहून कार्य केले. हिस्लॉप कॉलेज आणि मॉरिस कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापन केले होते. मात्र, संघाशी असलेली बांधिलकी सोडण्यास नकार देत त्यांनी अध्यापनास रामराम ठोकला होता. नंतर त्यांनी तरुण भारतमध्ये पत्रकारिताही केली होती. हिंदुत्त्वविषयी त्यांनी विपुल लेखनही केले. त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.