नागपूर : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त 18 किंवा 8-10 जागा मिळाल्या तर भाजपसोबत युती करु, असं सांगितलं आहे. तसेच आगामी काळात उत्तर प्रदेशात एक लाख लोकांचं संमेलन घेणार असंदेखील जाहीर केलं आहे.
रामदास आठवले आज नागपुरात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले गट) आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आरपीआय उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाग घेईल. यूपीतील दलित मतांवर फक्त मायावती यांचा अधिकार नाही. आम्ही यूपीमध्ये आगामी काळात एक लाख लोकांचं संमेलन घेणार आहोत, असं सांगितलं. तसेच उत्तर प्रदेशात बाह्मण समाजाचेही संमेलन घेऊ, असेही आठवले म्हणाले.
आठवलेनी केंद्रीय तपास यंत्रणेवर दावखण्यात येणाऱ्या अविश्वासावरही भाष्य केलं. त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा या निष्पक्ष आहेत. काही शंका असल्यास तपास यंत्रणा चौकशी करतात. आम्ही छापा टाकून काटा काढत नाही. काटा टाकून छापा टाकतो, असे भाष्य आठवले यांनी केलं.
उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्षांचा विचार करावा. अडीच वर्षे ते मुख्यमंत्री राहणार आणि अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपद सांभाळतील. सेना भाजपत समन्वय करायला मी तयार आहे. पण यांना समन्वय करायचा नाही, असे रामदास आठवले म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकीवर बोलताना अनेक शिवसैनिक नाराज आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत निवडणूक लढणार आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बंगाल केला तर आम्ही बंगालचा महाराष्ट्र करु अशी मिश्किल टिप्पणी आठवले यांनी केली.