पुणे – रोटरी क्लब युवा आयोजित रोटरी युवा बॉक्स क्रिकेट लीगमध्ये आरसीपी सिनर्जी संघाने आरसीपी मिक्स संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात आरसीपी मिक्स संघाने 4 बाद 59 धावा केल्या. आरसीपी सिनर्जी संघाने हे आव्हान 4.2 षटकांत 60 धावा करुन सहज पार केले. सामनावीर हा मान अमित शहाने पटकाविला.
कर्वेनगर येथील डर्बी स्पोर्टस येथे हे सामने खेळले गेले. दोन दिवसीय स्पर्धेत बारा संघांचा सहभाग होता. प्रत्येक संघामध्ये एका महिला खेळाडूसह सात खेळाडूंचा समावेश होता. प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, लढवय्या खेळाडू व उत्कृष्ट महिला खेळाडू अशी बक्षिसे देण्यात आली. विजेत्या संघाला करंडक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपविजेत्या संघालाही ढाल देण्यात आली.
याशिवाय लीगमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू, फलंदाज, गोलंदाज व महिला खेळाडूंना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल पंकज शाह यांच्या हस्ते झाले.
यावेळी शीतल शाह, शिरीष पुराणिक, मिलिंद अग्निहोत्री, शकुर सय्यद व अध्यक्ष तृप्ती नानल व सचिव दीपा बडवे आदी उपस्थित होते. बक्षीस समारंभ शीतल शाह ह्यांच्या उपस्थित संपन्न झाला. रोटरीक्लब युवाचे सदस्य गोपाळ निर्मल व बहार बडवे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली या लीगचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेला क्लबचे सदस्य सुनील हरपळे यांचे विशेष सहकार्य लाभले. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून या सर्व स्पर्धा संपन्न झाल्या.