सातारा – पर्यटनवाढीला चालना मिळावी आणि वयस्कर पर्यटक, भाविकांना किल्ले अजिंक्यतारा व प्रामुख्याने सज्जनगडावर येणे- जाणे सुलभ व्हावे यासाठी किल्ले अजिंक्यतारा व सज्जनगडावर रोप वे सुविधा करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु आहे. या दोन्ही किल्ल्यांवर रोप वे करण्याच्यादृष्टीने आ. शिवेंद्रसिंहराजें यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आज पाहणी केली.
पाहणीनंतर तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत लवकरच सर्वेक्षण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. निसर्गसौंदर्याने नटलेल्या सातारा शहर आणि तालुक्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सातारा शहरालगत ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा असून परळीलगत सज्जनगड हे ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
सज्जनगडावर असंख्य पर्यटकांसह हजारो भाविकांची दररोज गर्दी असते. यामध्ये वयस्कर लोक, महिलांचा मोठा सहभाग असतो. पर्यटक आणि खास करून वयस्कर भाविकांची सोय व्हावी, सर्वांचा वेळ आणि त्रास वाचावा यासाठी सज्जनगडावर आणि किल्ले अजिंक्यतारावर रोप वे आवश्यक आहे. हे ओळखून आ. शिवेंद्रसिंहराजेंनी रोप वे साठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु केला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार रोप वे संदर्भाने आज परिसराची पाहणी करण्यात आली. आ. शिवेंद्रसिंहराजे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (पुणे) प्रकल्प संचालक संजय कदम, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट आदी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. चार भिंती, किल्ले अजिंक्यतारा येथे पाहणी करून वाहनतळ कोठे करता येईल याची चाचपणी करण्यात आली.
चार भिंतीच्या खाली शाहूनगर अथवा कुरणेश्वर येथे वाहनतळ करून तेथून किल्ले अजिंक्यताऱ्यावर रोप वे करणे, अजिंक्यताऱ्यावरून सांबरवाडी येथे रोप वे आणि तिथून सज्जनगडावर रोप वे करणे अशी प्राथमिक चर्चा झाली. एकदा किल्ले अजिंक्यताऱ्यावर रोप वे ने गेलेला पर्यटक पुढे सांबरवाडीतून सज्जनगडावर जाईल आणि रोप वेनेच पुन्हा वाहनतळापर्यंत येईल, अशा पद्धतीने रोपवेचा मार्ग ठेवायचा की वेगवेगळे रोप वे करायचे याचा निर्णय तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर घेण्याची चर्चा यावेळी करण्यात आली. त्यामुळे लवकरच तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत रोप वे साठी सर्वेक्षण केले जाणार असून सातारकरांचे रोप वेचे स्वप्न सत्यात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.