हिंजवडी -मागील दोन वर्षांपूर्वी नेरे (ता. मुळशी) येथे पाळीव जनावरांना होणाऱ्या लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले होते. तोच संसर्गजन्य व भयानक साथीचा आजार आता पुन्हा मुळशीतील भुकूम गावात दाखल झाला आहे.
भुकूम येथील एका शेतकऱ्याच्या बैलाला लम्पी स्किन डिसीज झाल्याचे आढळून आले आहे. या आजारात जनावरांच्या त्वचेवर गाठी येऊन त्यातून रक्तस्राव होतो व जनावरे दगवण्याचे प्रमाण अधिक असल्याने मुळशी तालुक्यातील यावर्षीची ही पहिलीच केस असली तरी पाच किलोमीटरच्या परिघात जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात आले असल्याची माहिती मुळशीच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. सचिन भीमराव काळे यांनी दिली.
भुकूममधील एका शेतकऱ्याने कोल्हापूरवरून खिल्लार जातीचा हा बैल विकत आणला होता. दोन-तीन दिवसांनंतर तो बैल काहीच खात नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पिरंगुट येथील पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना लक्षणे सांगितल्यानंतर त्यांनी या बैलाच्या विविध आरोग्यविषयक तपासण्या व चाचण्या केल्या. त्यानंतर पुढील 48 तासांमध्ये त्यांचा रिपोर्ट येऊन तो बैल लंपी पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
औंध येथील जिल्हा पशु संवर्धन चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. एम. एम. शिंदे तसेच पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सचिन काळे आणि भुगाव येथील पशुधन पर्यवेक्षक गहिनीनाथ बढे यांनी तातडीने या शेतकऱ्याच्या गोठ्याला भेट देऊन त्यांना सर्व माहिती देऊन कशाप्रकारे काळजी घ्यायची याबाबतचे मार्गदर्शन केले. आयटी सेक्टर व औद्योगिकरणामुळे मुळशीत आता पशुधन कमी असून या लंपी भीषण साथीच्या रोगामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांची झोप उडालेली आहे.
अजित पवारांनी विमा व तत्काळ लसीकरणाची केली मागणी
लम्पी हा आजार मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याने राज्य व केंद्र सरकारने तातडीने लसीकरण करून घ्यावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात केली. ते म्हणाले बळीराजाला मदत व दिलासा देण्यासाठी सरकारने गरज पडली तर परदेशातून लस मागवावी. परंतु शेतकऱ्यांची जनावरे दगावली जाता कामा नये. तसेच या आजारात बळी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा कवच देऊन नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.