पिंपरी – शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी आणि हा कचरा कचरा डेपोत घेऊन जाण्यासाठी 387 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी दोन ठेकेदारांची महापालिकेच्या आरोग्य विभागाने नेमणूक केली आहे. मात्र, अनेक भागात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा असूनही आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळत नाही. त्यामुळे आता महापालिकेतच कंन्ट्रोल रूम करण्यात येणार आहे.
शहरात सुमारे 1100 टन दररोज कचरा निर्माण होतो. यासाठी बीव्हीजी आणि ए. जी. एनव्हायरो या दोन ठेकेदारांची नेमणूक केली आहे. ठेकेदार घंटागाड्या, कॉम्पफॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून कचरा गोळा करतात. मात्र, शहरातील अनेक भागात वेळेवर अथवा घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी येत आहे.
या सर्व गाड्यांना व्हेईकल ट्रॅंकिंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दापोडीत एकाच ठिकाणी सेंटर केले आहे. तसेच आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मोबाइलवरही गाड्यांची माहिती मिळत आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळत नाही. त्यामुळे आता महापालिकेतच कंट्रोल रूम करण्याचा निर्णय घेतला आहे. उपायुक्त चारठणकर म्हणाले, कचरा गाडी एखाद्या भागात गेली की नाही? याची महापालिकेत माहिती मिळत नाही. त्यामुळे या कचरा गाड्यांवर माहिती महापालिकेत बसून मिळावी, यासाठी महापालिकेतच कंन्ट्रोल रूम करण्याचा निर्णय घेतला आहे.