रूपगंध: अभिजात शब्दांचा चिरंजीव आविष्कार कुसुमाग्रज

वि. स. खांडेकरांनंतर ज्ञानपीठ पारितोषिक पटकावणारे दुसरे मराठी साहित्यिक म्हणजे वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज. अनुभवावर आधारित अभिजात लेखनाला प्राधान्य देणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कविता अबालवृद्धांना तोंडपाठ आहेत.

माणसाच्या पृथ्वीवरील मरणाधीन जीवनामध्ये अभिजात शब्द ही एक अशी शक्‍ती आहे, की जिला मरण नाही; जी चिरंजीव आहे. या शक्‍तीचा परमोच्च आविष्कार काव्यादी साहित्यात होत असतो. म्हणून या शक्‍तीचा आश्रय घेऊन माणसाची संस्कृती एका युगातून दुसऱ्या युगात प्रवेश करीत असते. माणसाची संस्कृती म्हणजे अंधार आणि प्रकाश यांच्यातील चिरंतन संघर्षाचा इतिहास आहे.

न्याय-अन्यायाची, सुंदर-असुंदराची, जीवाशिवाची जाणीव असलेली काव्यशक्‍ती प्रकाशाच्या बाजूने उभी राहते आणि म्हणूनच ती सामाजिक विकासाची सहचरी होऊ शकते…’ ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रजांनी केलेल्या भाषणातला हा अंश. यातून त्यांचे साहित्यविषयक चिंतनच परिवर्तित होताना दिसते.

सगळेच साहित्यप्रकार हाताळणाऱ्या कुसुमाग्रजांचे कविता हे पहिले प्रेम. महाविद्यालयाच्या काळात त्यांच्या कविता प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी एकाहून एक सरस कविता मराठीला दिल्या. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, “काव्याची वा एकूण सर्वच साहित्याची निर्मिती ही नदीच्या उगमाप्रमाणे एक नैसर्गिक आणि निरपेक्ष घटना असते; पण नदी ही उगमापाशी थांबत नाही.

थांबली तर ती नदीच होऊ शकत नाही. काव्यासारखे साहित्यही उगमापाशी थांबत नाही. नदीप्रमाणेच आत्मतेची शीव ओलांडून ते लोकजीवनात प्रवेश करते.’ त्यांची कविता अशीच नदीसारखी आहे. ती खाचखळगे, दगड आणि शिळांचा मुलाहिजा न बाळगता मुक्‍त स्वातंत्र्याचा मधुर स्वर आळवणारी आहे. गावातले, स्त्रीच्या मनातले, झोपडीतले दुःख पदरात घेणारी आहे आणि त्याचवेळी आत्ममग्नतेची सीमा ओलांडत समाजमनाची स्पंदने टिपत लोकजीवनात शिरकाव करणारीही आहे.

अशा वैशिष्ट्यांमुळेच त्यांच्या अनेक कविता जनमानसाच्या काळजावर कोरल्या गेलेल्या आहेत. “कणा’सारखी निराशेच्या राखेतून उंच भरारी घेण्याचे बळ देणारी कविता असो की खऱ्या प्रेमाची व्याख्या सांगणारी “प्रेम कर भिल्लासारखं…’ ही कविता असो की “नको गं नको गं आक्रंदे जमीन…’ ही रेल्वेगाडीचा ताल धरणारी रचना असो. अशा कित्येक रचना मराठी भाषिक अबालवृद्धांना तोंडपाठ आहेत.

“पुतळे’ ही कविता राजकारणावर टीका करणारी असली तरी त्यात राजकीय टीका नाही हे लक्षात घ्यायला हवे. “कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेची मूळ कल्पनाच अचाट आहे. कोलंबस नवीन भूमीच्या शोधात गलबत घेऊन समुद्रात उतरतो आणि नवी भूमी शोधतोही. या कवितेतल्या शेवटच्या ओळी म्हणजे दुर्दम्य आशावादाचा परिपाक आहेत, त्या अशा “अनंत अमुची ध्येयासक्‍ती, अनंत अन्‌ आशा, किनारा तुला पामराला…’ माणूस म्हणून आमची ध्येयासक्‍ती आणि आशा अनंत, असीम, अमर्याद आहे. पण ज्याला जग अथांग समजते तो समुद्रही किनाऱ्यापुरता मर्यादित आहे.

मानवी अनंत ध्येयासक्‍तीच्या तुलनेत अथांग सागर हा सीमित नव्हे पामर आहे, असे म्हणायचे धाडस कुसुमाग्रज करतात. सच्च्या कवीची हीच तर खासियत असते. याखेरीज मानवी जीवन, भावना, दारिद्य्र, हालअपेष्टा यांचे शब्दचित्र उभं करणाऱ्या त्यांच्या अनेक कविता आहेत. त्यांची प्रत्येक रचना काळजाला थेट भिडणारी, आपल्याच आसपासचे वास्तव मांडणारी आहे, म्हणून तर ती सगळ्यांना भावते.

बा. सी. मर्ढेकर कवीच्या आत्मनिष्ठेला सर्वाधिक महत्त्व देतात पण कुसुमाग्रज कवीच्या अनुभूतीला सर्वाधिक महत्त्व देतात. त्याचे कारण कुसुमाग्रजांच्या कवितेचे विषय आणि आशय पाहिल्यावर लगेच लक्षात येते. समाजातल्या नेमक्‍या विसंगती, निराशा, वाईटपणा यावर भाष्य करणारी आणि सकारात्मकता देणारी त्यांची कविता आहे. ही वृत्ती त्यांच्या मूळ स्वभावातून आलेली आहे आणि या स्वभावाची जडणघडण बालपणापासून पाहिलेल्या-अनुभवलेल्या गोष्टींमध्ये आहे.

कुसुमाग्रजांच्या मते काव्य म्हणजे माणसाने स्वतःच्या भोवतालच्या परिसराशी साधलेला संवाद. हा संवाद जेव्हा कवितेच्या रूपाने श्रोते किंवा वाचकांपर्यंत पोहोचतो तेव्हा व्यक्‍तीच्या आतला कवी सुखावतो. एकाचवेळी कवी तिहेरी संवाद साधत असतो. तो परिसराशी संवाद साधत असतो, स्वतःशी संवाद साधत असतो आणि श्रोत्यांशीही संवाद साधत असतो. या अशा बहुआयामी संवादामुळे कवीची प्रतिभा आणि व्यक्‍तिमत्त्वही व्यापक, प्रगल्भ होत जाते.
कुसुमाग्रजांना “ज्ञानपीठ पारितोषिक’ मिळाले ते त्यांच्या “नटसम्राट’ या नाटकासाठी.

“नटसम्राट’ने कुसुमाग्रजांना खऱ्या अर्थाने जागतिक ओळख दिली. उतारवयातल्या नटसम्राटाची फरपट या नाटकात मांडली आहे. उमेदीच्या काळात टीपेला असलेला आशावाद, ऊर्जा, प्रसिद्धी आणि उतारवयात क्षीण होत गेलेली शारीरिक-मानसिक शक्‍ती नि आशावाद यांचे चित्रण या नाटकात आहे.

हे नाटक शेक्‍सपिअरच्या अनेक कलाकृतींवरून प्रेरित असले तरी ते स्वतंत्र नाटक आहे. या नाटकाने इतकी उंची गाठली की मोठमोठे नट यातील भूमिकांमुळे खरेखुरे “नटसम्राट’ बनले. यावर अलीकडेच एक चित्रपटही येऊन गेला. त्यात अप्पा बेलवलकर ही प्रमुख व्यक्‍तिरेखा सुप्रसिद्ध नट नाना पाटेकर यांनी साकारली होती.

मराठी भाषेसाठी कुसुमाग्रज अत्यंत आग्रही होते. इंग्रजी भाषेचा बागुलबुवा त्यांना अजिबातच मान्य नव्हता. इंग्रजी भाषेबद्दल विचार मांडताना ते म्हणाले होते की, “इंग्रजांची सत्ता गेली, पण इंग्रजीची सत्ता वाढत्या प्रमाणात येथे फैलावते आहे. याचा संभाव्य अर्थ हाच, की आपल्या मनातील गुलामगिरीचे सावट अद्याप पूर्णतः नष्ट झालेले नाही.

भारतातील कोणाही नागरिकाला आपल्याला इंग्रजी येत नाही याचा संकोच वाटावा किंवा इंग्रजी येत नाही म्हणून प्रगतीचे अनेक दरवाजे, त्याच्यासाठी बंद असावेत, ही परिस्थिती खरोखर लज्जास्पदच आहे. बहुसंख्य लोकांना न कळणाऱ्या भाषेत आपले सर्व वरच्या पातळीवरील आर्थिक-राजकीय व्यवहार होत असल्यामुळेच लोकांना न कळणाऱ्या भाषेत चालणारी “लोकशाही’, ही अद्‌भूत घटना (सुसंस्कृत जगात कुठेही नसलेली) आपण सिद्ध करीत आहोत.’

“देशातील बहुसंख्यांना न समजणाऱ्या परस्थ भाषेचा पांगुळगाडा घेऊन, सामाजिक परिवर्तनाचा, प्रगतीचा पर्वत आपण चढू पाहात आहोत. समाजाच्या परिवर्तनाची वा क्रांतीची पेरणी ही स्वभाषेच्या किनाऱ्यावरच होऊ शकते,’ असं त्यांचे ठाम मत होते. कुसुमाग्रज आपल्यातून निघून गेले त्याला दोन दशकांपेक्षा जास्त काळ लोटला. पण त्यांच्या लेखणीचे गारूड आजही मराठी मनावर कायम आहे.

डॉ. भालचंद्र सुपेकर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.