शहरात दीडशेहून अधिक हॉटेल्स ः आग लागण्याचा धोका वाढला
पिंपरी (प्रतिनिधी) – शहरात रुफटॉप रेस्टॉरंटचे पीक जोरात वाढले आहे. हे रेस्टॉरंट उभारताना हॉटेलवाल्यांनी सगळे नियम धाब्यावर बसविले आहेत. त्यांच्यावर महापालिका प्रशासन काहीच कारवाई करत नाही. त्यामुळे नियमांची पायमल्ली करीत सुरू असलेल्या या रेस्टॉरंटमुळे एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरातील हिंजवडी, वाकड, भोसरी, पिंपळे सौदागर या परिसरामध्ये दीडशे हून अधिक रुफटॉप रेस्टॉरंट नियम तुडवून सुरू आहेत. इमारतीच्या छतावर रेस्टॉरंट व बार सुरू असतात. त्यासाठी कोणतीही काळजी घेतली जात नाही. शहरातील अनेक इमारतींच्या छतावर चारही बाजूना प्लायवूड उभे करून रेस्टॉरंट चालवले जातात. त्यासाठी सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. अग्निशामक यंत्रे बसविण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागाने शहरात एकाही रुफटॉप रेस्टॉरंटला परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही या रेस्टॉरंटचा सुळसुळाट झालेल्या पाहयला मिळत आहे. नियमानुसार महापालिकेच्या अग्निशामक विभागाने एनओसी दिल्याशिवाय रेस्टॉरंट व बार चालवता येत नाही. यासंदर्भात अग्निशामक विभागाने कोणत्याही रेस्टॉरंट व बारला परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली. रुफटॉप रेस्टॉरंट, बारवर महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अग्निशामक विभागाच्या वतीने देण्यात आली.
हिवाळ्यात अधिक धोका
हिवाळ्यात रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट व बारमध्ये ग्राहकांना शेकोटीची सुविधा दिली जाते. त्यासाठी शेड उभारण्यात येते. हिंजवडी येथील काही रेस्टॉरंटच्या छतावरच स्वयंपाकगृह चालवले जाते. या भागामध्ये आग लागण्याची शक्यता जास्त आहे.
रुफटॉप हॉटेलची संख्या मोठी
इंटरनेटवर शहरातील रुफटॉप हॉटेल व बार सर्च केले तर त्यावर मोठीच्या मोठी यादी येते. त्यातील सुविधांचीही माहिती दिली जाते. शहरामध्ये सुमारे दीडशेहून अधिक हे हॉटेल आहेत. मात्र, महापालिका प्रशासन हातावर हात धरून बसले आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागून मोठी जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण राहणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अग्निशामक विभागाने कोणत्याही रुफटॉप रेस्टॉरंट व बारला शहरामध्ये परवनागी दिलेली नाही. जी हॉटेल सुरू आहेत ती सर्व अनधिकृतरित्या सुरू आहेत. अग्निशामक विभागाच्या वतीने परवानगी दिली जात नाही. त्यामुळे या विभागाकडून कारवाई केली जात नाही. शहरातील रुफटॉप रेस्टॉरंटवर कारवाई करण्याची जबाबदारी स्थापत्य विभागाची आहे.
– किरण गावडे, प्रमुख अग्निशामक विभाग, पिंपरी- चिंचवड महापालिका