पिंपरी (प्रतिनिधी) – अनेकांना प्रतीक्षा असलेल्या शिवभोजन थाळी योजनेला आज दि. 26 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 4 ठिकाणी ही शिवभोजन थाळी मिळणार असून, ती ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रत्येक केंद्रात 150 लोकांना मिळणार आहे. थाळीचा लाभ घेणाऱ्यांचे फोटो काढून ते दररोज केंद्रचालकांकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठविले जाणार असून, महा अन्नपूर्णा ऍपवर ही माहिती संकलित होणार आहे.
राज्यात शिवभोजन योजना राबविण्यात येणार असून, या योजनेंतर्गत राज्यातील नागरिकांना अवघ्या दहा रुपयांत जेवणाची थाळी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात केली होती. 26 जानेवारीपासून या योजनेला आरंभ होणार आहे. प्रत्येक केंद्रामध्ये 150 लोकांनाच दुपारी 12 ते 2 या वेळेत हा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांचे फोटो केंद्रचालकांकडून काढण्यात येणार आहेत. ते फोटो महा अन्नपूर्णा ऍपवर केंद्र चालकांकडून डाउनलोड केले जाणार आहेत. त्यावरून प्रत्येक केंद्रामध्ये दररोज किती लोकांनी लाभ घेतला, याची माहिती संकलित होणार आहे.
या ठिकाणी मिळणार शिवभोजन थाळी
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महापालिकेचे कॅंटीन, यशवंतराव चव्हाण रुग्णालय (वायसीएम) कॅंटीन, वल्लभनगर एसटी बस स्थानक कॅंटीन, व पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण येथील कॅंटीन या ठिकाणी शिवभोजन थाळी मिळणार आहे.