मुंबई – भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याने आपण आणखी पाच वर्षांनी निवृत्ती घेऊ असे सांगत चाहत्यांना धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याच्याशी सोशल मीडियावर केलेल्या संभाषणात रोहितने हे संकेत दिले आहेत.
एखादा खेळाडू त्याची कारकीर्द सुरू करतो तेव्हा तो प्रचंड व्यस्त असतो. त्याला खेळासाठी संपूर्ण वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्याला आपल्या कुटुंबाला वेळच देता येत नाही. जणू तो खेळ त्याचे आयुष्यच बनून जाते. आज मी 33 वर्षांचा आहे, आणखी जवळपास पाच वर्षांनी निवृत्ती घेण्याची माझी इच्छा आहे. अर्थात त्यावेळी माझी तंदुरुस्ती, कामगिरी हे निकष अत्यंत महत्त्वाचे ठरतील, असेही मत रोहितने व्यक्त केले.
भारतीय संघाकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते, ते पूर्ण झाले. केवळ एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांचा क्रिकेटपटू अशी ओळख बनली होती. त्याचवेळी कसोटी क्रिकेटमध्येही कामगिरी सिद्ध करण्यासाठी मी खूप मेहनत घेत होतो. आता या स्तरावर देखील मी स्वतःला सिद्ध केले आहे. आता ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक तसेच एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक भारतीय संघाने जिंकावा यासाठी कामगिरीत सातत्य राखण्यासाठी यापुढेही मी प्रामाणिकपणे मेहनत घेत आहे, असेही त्याने सांगितले.