बगदाद – इराकची राजधानी असलेल्या बगदाद विमान तळाच्या दिशेने गुरूवारी रात्री एकूण आठ रॉकेट्स डागण्यात आली. त्यातील तीन रॉकेट्स विमानतळ संकुलात येऊन पडली असल्याची माहिती इराकी लष्कराने दिली आहे. तथापि, त्यात काय नेमके नुकसान झाले आहे याची माहिती मात्र लष्कराने दिलेली नाही.
यातील काही रॉकेट्स इराकी सुरक्षा आस्थापनांच्या विविध कार्यालयाच्या परिसरात पडली. या रॉकेट हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. तथापि इराण पुरस्कृत दहशतवादी संघटनांनीच हे कृत्य केले असावे असा कयास अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही आठवडयांमध्ये इराक मधील अमेरिकन तळांवरही रॉकेट हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. गेल्याच महिन्यात अमेरिकन सैन्य ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे त्या परिसरात एकूण दहा रॉकेट्सचा अशाच पद्धतीने मारा झाला होता. त्यात एक जण ठार झाला होता.