बीजिंग – चीनमधूनच करोनाचा जगभरात प्रसार झाला. मात्र आज जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये करोना नियंत्रणात आहे. चिनी आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी माहिती दिली की आता फक्त 315 सक्रिय प्रकरणे त्यांच्या देशात आहेत, त्यापैकी 241 जण हे बाहेरून आलेले आहेत. त्यांनी हे कसे साध्य केले याचा आता आढावा घेतला जातो आहे.
चीनच्या सरकारने आर्थिक व्यवहार आणि सामाजिक जीवन टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करून, सरकारने कोल्ड चेन ट्रॅफिक, दुकाने, वैद्यकीय सेवा इत्यादीसारख्या संवेदनशील व्यवसायात नोकरी करणाऱ्यांसाठी नियमितपणे करोना स्क्रीनिंगसारख्या प्रतिबंधक खबरदारीच्या उपायांवर बारीक लक्ष ठेवले. शरीराचे तापमान तपासणी आणि क्यूआर कोड सार्वजनिक ठिकाणी लागू करण्यात आला आहे. मास्क वापरणे अनिवार्य आहे.
दुसरे म्हणजे तेथे संसर्ग वाढल्यानंतर वेगाने यंत्रणा हलवण्यात आली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये चीनच्या वुहान शहरातून लॉकडाऊन हटवण्यात आले होते. यानंतर पुन्हा काही ठिकाणी संसर्ग वाढला होता. पण चीनने लगेचच त्यावर नियंत्रण मिळवले. कोविड संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना लगेचच शोधणे आणि त्यांना क्वारंटाईन करणे. त्या भागात लगेचच लॉकडाऊन करणे, मोठ्या प्रमाणात चाचणी घेणे यासारख्या गोष्टींमुळे त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले.
चीनमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने पदावरून काढून टाकणे आणि नियमांनुसार शिक्षा देणे असे उपाय केले जात आहेत. यावर्षी मार्चमध्ये रुईली प्रदेशात करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर सीपीसी समितीचे सचिव कोंग युनजुन यांना लगेचच त्यांच्या पदावरुन हटवण्यात आले होते.
नागरिकांकडून सरकारच्या आदेशांचे तंतोतंत पालन केले जाते आहे. फेब्रुवारीमध्ये चीनचा सर्वात महत्त्वाचा सण होता. सरकारने लोकांना उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. सण साजरा करण्यासाठी मूळ गावी परत न जाण्याचे आवाहन केले होते. परिणामस्वरुप 2019 आणि 2020 च्या तुलनेत सण साजरा करण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या यंदा खूपच कमी होती. थोडक्यात तातडीने निर्णय, त्यांची अमलबजावणी आणि लोकांचे सहकार्य या त्रिसूत्रीने करोनावर नियंत्रण प्रस्थापित करता येऊ शकते असेच चीनी मॉडेल सांगते आहे.