मंचर – रस्ते अपघातास आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मंचर परिसरात पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.
वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षेसाठी शुक्रवार (दि. 17) पर्यंत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अभियानात जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. वाहनचालकांना मोटार वाहन कायद्याची माहिती देणे, महामार्गांवरुन जाणाऱ्या वाहनांना तसेच बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावणे, अवैध प्रवासी वाहतूक अवजड वाहतूकीवर कारवाई करणे, लायसन्सबाबत जनजागृती करणे, रस्ते सुरक्षाबाबत शालेय विद्यार्थ्याना माहिती देणे यांसारखे उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली. मंचर मधील वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे.
वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी, रस्त्यांच्या कडेला अस्ताव्यस्त पद्धतीने वाहने पार्क केली जात असल्यानेही समस्येत भर पडली आहे. त्यासाठी वाहतूक नियमांची जनजागृती केली जाते, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांनी दिली. सहाय्यक उपनिरीक्षक सागर खबाळे, वाहतूक पोलीस मंगेश लोखंडे, हनुमंत शिंदे, संदेश काळडोके आदींनी चालकांना वाहतुकीचे नियम, कागदपत्रे संबंधित माहिती दिली.