कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील
मंचर – लोणी (ता. आंबेगाव) येथे नवीन ग्रामीण रुग्णालय करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार करावा. येथे ग्रामीण रुग्णालय करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशा सुचना कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घोडेगाव येथे पंचायत समितीमध्ये विविध विभागांच्या आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, माजी सभापती कैलास काळे, सुभाष मोरमारे, प्रकाश घोलप, माजी सभापती उषा कानडे, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, तुलसी भोर, आशा शेंगाळे, रुपाली जगदाळे, इंदुबाई लोहकरे, सरपंच क्रांती गाढवे आदी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी पंचायत समितीच्या कामकाजाची माहिती दिली. मंत्री वळसे पाटील यांनी एकात्मिक बाल विकास विभागाच्या वतीने मुलांना दिल्या जाणाऱ्या खाद्य पाकिटांची पहाणी केली. विशिष्ट शाळेतील विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्तीमध्ये येतात. बाकीच्या शाळांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये येत नाहीत.
यासाठी शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची 108 पैकी फक्त 28 कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरीत कामे लवकर पूर्ण करावीत. सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक विभागाचा कामानुसार आढावा घ्यावा. राज्याच्या बजेटमध्ये तालुक्यातील कुठल्या कामांना किती निधी हवा. तसेच तालुक्याच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी यावेळी आढावा बैठक घेण्यात आली. अशी माहिती कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
समितीमधील लघु पाटबंधारे विभागाला असलेल्या उपअभियंता यांच्याकडे चार तालुक्याचा पदभार आहे. आंबेगाव तालुक्यासाठी नवीन उपअभियंता हवा. एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या मंचर व आंबेगावची दोन्ही पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागात एकतीस रिक्त जागा आहेत. पैकी दोन वैद्यकीय अधिकारी जागा रिक्त आहेत. या सर्व जागा भरण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.