पुणे – शहरात सध्या गल्लोगल्ली तसेच मुख्य रस्त्यांवर बिनमालकाच्या गाड्यांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र दिसते. उपनगरांतही अशा धूळखात पडून असणाऱ्या गाड्यांची संख्या शंभरावर आहे. हा आकडा निश्चितच गंभीर असून यामुळे प्रशासनाची निष्क्रियता दिसून येते.
पडून असणाऱ्या गाड्यांमध्ये कार, टेम्पोंचे प्रमाण सर्वाधिक असून त्या खालोखाल दुचाकींचा क्रमांक लागतो. पडून असणाऱ्या गाड्यांच्या मूळमालकांचा पत्ताच नसून परिणामी गेल्या कित्येक महिन्यांपासून या गाड्या रस्ते आडवत उभ्या आहेत.
परंतु, याकडे पालिका व वाहतूक प्रशासनाचे लक्ष अद्यापही गेलेले नसून परिणामी अशा धूळखात पडून असणाऱ्या गाड्यांमुळे वाहतुकीला दररोज अडथळा ठरतो.
तसेच बंद गाड्यांमध्ये मद्यपी बसून धिंगाणा घालत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून परिणामी महिलांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. या गाड्यांमध्ये केरकचराही टाकला जात असून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.