बुलडाणा – बुलडाणा येथे एका भरधाव स्कॉर्पिआने धडक देवून झालेल्या भीषण अपघातात रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या बाप-लेकासह एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. हा अपघात शेगाव-खामगाव रोडवरील माऊली कॉलेजजवळ रात्रीच्या सुमारास घडला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
स्वप्नील उर्फ लखन मरिभान बावणे (वय 30) आणि त्याचे वडील मरिभान हिरामन बावणे (वय 50) आणि शेख रज्जाक शेख रहेमान (वय 40) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, हे तिघेही फैल शेगाव येथील रहिवाशी आहेत. रात्रीच्या सुमारास एका कामानिमित्त ते माऊली कॉलेजजवळ दुचाकी उभी करून रस्त्याच्याकडेला उभे होते. तेवढ्यात शेगावहून खामगावकडे जाणाऱ्या स्कॉर्पिआने त्यांना धडक दिली. यामध्ये स्वप्नील बावणे आणि मरिभान बावणे हे दोघे बाप-लेक जागीच ठार झाले. तर शेख रज्जाक शेख रहेमान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोला येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी स्कॉर्पिआ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर एकाच वेळी गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.