केरळमधील सोने तस्करी प्रकरणामुळे डाव्या पक्षांचे सरकार बॅकफुटवर

थिरूवनंतपूरम -केरळमधील विधानसभा निवडणूक सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच त्या राज्यात सोने तस्करी प्रकरणावरून मोठे राजकीय वादळ घोंघावू लागले आहे. त्या प्रकरणात निलंबित आयएएस अधिकाऱ्याला अटक झाल्याने केरळमधील डाव्या पक्षांचे सरकार बॅकफुटवर गेले आहे.

मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्या नेतृत्वाखाली केरळ सरकारने साडेचार वर्षांच्या कार्यकाळात चांगली कामगिरी केल्याचा दावा सत्तारूढ डाव्या आघाडीकडून सातत्याने केला जात आहे. त्या कामगिरीच्या आधारे केरळमधील सत्ता राखण्याचा विश्‍वासही त्या आघाडीकडून वारंवार व्यक्त केला जातो. केरळच्या रूपाने डाव्या पक्षांच्या हाती देशातील एकमेव राज्याची सत्ता आहे. त्यामुळे ती सत्ता राखण्यासाठी डाव्या आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, सोने तस्करी प्रकरण चव्हाट्यावर आल्यापासून केरळ सरकारची आणि डाव्या आघाडीची मोठीच कोंडी झाली आहे. जुलैमध्ये थिरूवनंतपूरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 15 कोटी रूपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले. ते सोने राजनैतिक स्वरूपाच्या सामग्रीत सापडल्याने मोठीच खळबळ उडाली.

त्या सोने तस्करी प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक झाली आहे. मात्र, बुधवारी निलंबित आयएएस अधिकारी एम.शिवशंकर यांना त्याप्रकरणी अटक झाल्याने आणखीच राजकीय सनसनाटी निर्माण झाली आहे.

शिवशंकर यांनी याआधी मुख्यमंत्री विजयन यांच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातील सर्वांत प्रभावशाली अधिकारी म्हणून त्यांची ओळख बनली होती. आता त्यांच्या अटकेने विजयन आणि डाव्या आघाडीच्या सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेस आणि भाजप या केरळमधील विरोधी पक्षांना प्रभावी राजकीय अस्त्र मिळाले आहे. त्यातून त्या पक्षांनी विजयन यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत राज्यभरात सरकारविरोधी निदर्शनांचे सत्र सुरू केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.