चिखली – कुदळवाडी येथील मोरे पाटील चौकात चिखली बीआरटी मार्गात साधारण एक महिन्यापासून ड्रेनेजलाइनच्या चेंबरचे झाकण काढून ठेवले आहे. ड्रेनेजलाइन सातत्याने ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे या चेंबरची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोरे पाटील चौकातून पिंपरीकडे जाणार्या मार्गावर व्यावसायिक दुकानांच्या समोरच ड्रेनेजलाइनचे उघडे चेंबर आहे. या चेंबरमधून मैलामिश्रित दूषित पाणी रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून व्यावसायिकांना व नागरिकांना त्रास होत आहे. दूषित पाणी चौकात जमा होत असल्याने चार चाकी वाहनांच्या मागे जाणार्या दुचाकीचालकांच्या व पादचारी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. या चेंबरची दुरुस्ती करण्याबाबत माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी बीआरटीच्या अधिकार्यांशी वारंवार संपर्क करून तक्रार दाखल केली आहे. परंतु अद्याप प्रशासनाला जाग येत नाही.
पादचार्यांना अपघात
मोरे पाटील चौक हा कुदळवाडीतील महत्त्वाचा व रहदारीचा मार्ग आहे. या चौकातून बालघरे वस्तीत जाण्यासाठी मार्ग आहे. या मार्गाजवळूनच ड्रेनेजलाइन गेल्याने रात्री पथदिवे बंद असताना चेंबर दिसून न आल्याने तीन चार पादचार्यांना येथे अपघात झाला आहे. तरी देखील बीआरटी व महापालिका लक्ष देताना दिसून येत नाही.
आरोग्याचा प्रश्न गंभीर
उघड्या चेंबरमुळे मैलामिश्रित पाणी परिसरात पसरत आहे. तसेच डासांचे प्रमाण वाढले आहे. दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. डासांमुळे मलेरिया, डेंगीसदृश्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
एक महिन्यापासून येथील ड्रेनेजलाइन सातत्याने तुंबत आहे. महापालिकेचा ड्रेनेज विभाग ही लाइन बीआरटीअंतर्गत येते असे सांगून तात्पुरती डागडुजी करत आहेत. परंतु सध्या चेंबरवरील झाकण बाजूला काढून ठेवल्याने नागरिक व वाहनचालकांना अपघात घडत आहेत. तरी येथील ड्रेनेजलाइन त्वरित दुरुस्त करावी. बीआरटीचे प्रवीण माळी यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही.
– दिनेश यादव, माजी स्वीकृत सदस्य.
मोरे पाटील चौकात ड्रेनेजलाइन तुंबत आहे. ड्रेनेज विभागाच्या अधिकार्यांशी बोलून लाइन साफ करून घेतो. या ड्रेनेजलाइन सांडपाण्याची वाहिनी जोडल्याने ही लाइन तुंबत आहे. तरी हे काम लवकरात लवकर करून घेतो.
– प्रवीण माळी, अभियंता, बीआरटी.