मोशी, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून पुणे-नाशिक महामार्ग जातो. परंतु भोसरी व मोशी परिसरात महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे मुख्य रस्ता व साइडपट्ट्या यात अंतर पडल्याने दुचाकी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महामार्गाच्या साइडपट्ट्या भरून घ्याव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. भोसरीतील ऐतिहासिक प्रवेशद्वार आणि गुडविल चौकात वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आले आहेत. या चौकांमध्ये वाहने थांबतात. काही दुचाकीचालक रस्त्याच्याखाली उतरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या भागातील रस्त्याची साइडपट्टी न भरल्याने रस्त्याची पातळी जमिनीच्या पातळीच्या अर्धा ते एक फूट उंचावर आहे.
त्यामुळे दुचाकीचालक मुख्य रस्त्यावर चढण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकी घसरते. वाहतूक दिवे सुरू झाल्यावर सर्वच वाहने वेगाने पुढे जात असल्याने दुचाकीवरून घसरणार्या वाहनचालकांना अपघात होऊन जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या साइडपट्ट्या तातडीने भरण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.