सातारा – ऋषीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत घेतलेल्या प्रवेशाशी माझा काहीही संबंध नाही. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
जावळी तालुक्याचे नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आमदार शिंदे यांना हा धक्का मानला जात आहे.
यासंदर्भात आ. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “मला टार्गेट करण्याचा हा भाजप व शिंदे गट शिवसेनेचा प्रयत्न आहे. आमचे बंधू यांचे व्यवसाय व कामे यातून सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकल्याने त्यांची अडचण होत असेल. त्यातून त्यांनी हा निर्णय घेतला असेल. या निर्णयामुळे माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. परंतु, या माध्यमातून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. बंधूंच्या नावाचा वापर करुन मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांचा हा प्रयत्न सुरु होता. पण त्यांना यश आलेले नाही. मी कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार असून ऋषिकांत यांच्या या निर्णयामुळे माझ्यावर काहीही फरक पडणार नाही.”
त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत
शिंदे गट शिवसेना व भाजपने अशा प्रकारे अनेक कुटुंबात फोडाफोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, आगामी काळात मी त्यांचे घर फोडणार असून त्यातून त्यांना आगामी निवडणुकीत परिणाम दिसेल. माझे राजकीय करिअर उद्धवस्त करण्याचा शिंदे गट शिवसेनेचा उद्देश असून या प्रयत्नात ते कधीही यशस्वी होणार नाहीत. मी कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार आहे. विरोधकांना आगामी निवडणुकीत जनताच धडा शिकवेल, असेही आ. शिंदे यांनी स्पष्ट केले.