पुणे-प्लॅस्टिकचे प्रदूषण आणि त्याचे करायचे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न डॉ. मेधा ताडपत्रीकर यांनी केला आहे. त्यांच्या “रुद्र एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स इंडिया लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून संशोधन करून प्लॅस्टिकपासून इंधन बनवण्याचा (पॉलिफ्युएल) उपक्रम त्यांनी सुरू केला.
राज्यात प्लॅस्टिक बंदी झाली परंतु प्लॅस्टिकचा वापर कमी झाला का, तर याचे उत्तर “नाही’ असेच येईल. कारण प्लॅस्टिकचा फॉर्मेट केवळ पॉलिथीन बॅग एवढाच मर्यादित नाही, तर आपण सकाळी उठल्यावर दात घासतो, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रश पासून, अंघोळीची बादली, मग आणि पुढे अनेक गोष्टींमध्ये आहे. त्यातील अनेक वस्तू या प्लॅस्टिकपासूनच बनवलेल्या असतात.
प्लॅस्टिकबंदीनंतर समाज माध्यमांमध्ये याविषयी विचारमंथन सुरू झाले. प्लॅस्टिक संकलित करून त्या बदल्यात पर्यावरपूरक पर्याय कसे वापरात आणावेत याबद्दलची चर्चा सुरू आहे. एका अभयारण्यात सहलीसाठी गेलो असता तेथील दोन हरणांचा मृत्यू झाल्याचे समजले. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या पोटात प्लॅस्टिक मिळाल्यामुळे हरणे दगावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्लॅस्टिक कायमचे नष्ट करण्यासाठी काय करता येईल या विचारातून संशोधनाला सुरुवात झाली. मी माझ्या गाडीतून गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन प्लॅस्टिक केले. प्लॅस्टिक निर्मिती मोठ्याप्रमाणात होते, परंतु त्याची विल्हेवाट कशी लावायची याविषयी मात्र यंत्रणा आपल्याकडे अपुरी आणि तोकडी आहे. प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तू घरात वापरणार तरी किती हा देखीलप्रश्न महत्वाचा आहे, त्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणाही आपल्याकडे म्हणावी तितकी नाही, असे डॉ. ताडपत्रीकर सांगतात.
आम्ही हे इंधन प्रकल्प आणखी काही ठिकाणी सुरू करत आहोत. याशिवाय हे प्रकल्प खेडेगावांमध्ये सुरू करणार असून, यामाध्यमातून प्लॅस्टिक संबंधी जागृती होईल, असेही डॉ. ताडपत्रीकर म्हणाल्या.
हे इंधन कशासाठी वापरता येते?
कोणत्याही जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या, डबे, टूथपेस्ट वा औषधांच्या वेष्टनासाठी वापरलेल्या प्लॅस्टिकच्या पुंगळ्या, कपडे धुण्याच्या साबणाची प्लॅस्टिकची वेष्टने, विविध पदार्थाची प्लॅस्टिक रॅपर्स, कॅसेट किंवा सीडीची कव्हर्स, प्लॅस्टिकची खेळणी, फुटक्या बादल्या, जुनी प्लॅस्टिक फुले, प्लॅस्टिकपासून बनवलेले पडदे असे प्लॅस्टिक इंधनासाठीच्या मशिनमध्ये चालू शकते. दूध वा अन्नाच्या पिशव्या मात्र पाण्याने धुवून मगच साठवण्यास सांगितले जाते, म्हणजे साठवलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याला वास येत नाही. जेजुरीच्या प्लॅंटमध्ये इंधन उत्पादक मशिन्स बसवली असून त्यांची क्षमता 80 किलो व 600 किलो अशी आहे. हे मशिन आकाराने मोठे असून ते औद्योगिक क्षेत्रात वापरण्याजोगे आहे. तयार होणारे इंधन केरोसिनला पर्याय म्हणून बॉयलर, स्टोव्ह, पीकावरील फवारणीचे यंत्र किंवा भारतीय बनावटीच्या विद्युत जनित्रात वापरता येते. 40 रुपये प्रतिलिटर या दराने या इंधनाची विक्री केली जाते, अशी माहिती डॉ. ताडपत्रीकर यांनी दिली.
साधे प्रश्न, साधी उत्तरे प्लॅस्टिक म्हणजे नेमकं काय?
आपण प्लॅस्टिक वापरतो. पण, ते कशापासून तयार करतात? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर, पहिले पूर्णपणे सिंथेटिक प्लॅस्टिक हे “बेकेलाइट’ होते. जे सन 907 मध्ये लिओ बेककॅंड यांनी तयार केले होते. तर, “प्लॅस्टिक’ हा शब्द ग्रीक शब्द “प्लॅस्टिको’कडून आला आहे, ज्याचा अर्थ “आकार किंवा आकार घेण्यास सक्षम आहे, असा तो घटक’
प्लॅस्टिक कशापासून तयार करतात? प्लॅस्टिक हे सामान्यत: सेल्युलोज, कोळसा, नैसर्गिक वायू, मीठ आणि अर्थातच कच्चे तेल यांसारख्या नैसर्गिक, सेंद्रिय पदार्थांपासून प्लॅस्टिक पॉलिमरायझेशन किंवा पॉलीकॉन्डेन्सेशन प्रक्रियेद्वारे बनवले जाते. प्लॅस्टिक हे मुळात कृत्रिम किंवा अर्ध-कृत्रिम जैविक पॉलीमर आहे. यात इतर घटक असले, तरीही प्लॅस्टिकमध्ये कार्बन आणि हायड्रोजन संयुगांचा समावेश असतो. यात बऱ्याचदा सिलिकॉनचाही उपयोग केला जातो.
प्लॅस्टिकचे प्रकार किती?
पॉलीथिलीन टेरेफाथलेट – पीईटी, पीईटीई
उच्च घनता पॉलीथिलीन – एचडीपीई
पॉलिव्हिनाल क्लोराईड – पीव्हीसी
पॉलीप्रॉपलीन – पीपी
पॉलिस्टेय्रीन – पीएस
कमी घनतायुक्त पॉलीथिलीन – एलडीपीई