पुणे, दि. 2 -वर्दळीच्या नगर रस्त्यावर महापालिका हद्दीतून अवजड वाहने मुंबई, सोलापूर आणि साताऱ्याकडे जाताना शहरातील नगर रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे नगर रस्त्यावर अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी वाघोली ते लोहगाव आणि पुढे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत स्पाईन रस्त्याला जोडणारा सुमारे 5.7 किलोमीटरचा रिंगरोड आता महापालिका करणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी “पीएमआरडीए’कडून 65 मीटर रुंदीचा सुमारे 128 किलोमीटरचा रिंगरोड “पीएमआरडीए’कडून विकसित केला जाणार होता. मात्र, त्यातील 5.7 किलोमीटरचा मार्ग महापालिका करणार आहे. त्यासाठी सुमारे 212 कोटींच्या खर्चास पालिकेच्या एस्टीमेट कमिटीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. या रस्त्यामुळे नगर रस्त्यावरून येरवडामार्गे पिंपरी-चिंचवड, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना शहरात यावे लागणार नसल्याने वडगाव शेरी परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या भागातून रिंगरोड प्रस्तावित आहे. या रस्त्यासाठीचे सर्वेक्षण आणि भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. सुरुवातीला हा रस्ता 110 मीटर रुंदीचा करण्यात येणार होता. मात्र, या रस्त्याचा बहुतांश भाग महापालिका हद्दीतून जात असल्याने तसेच अनेक भागावर बांधकामे झाल्याने भूसंपादनात अडचण येण्याची शक्यता लक्षात घेऊन या रस्त्याची रुंदी 65 मीटर केली जाणार आहे. त्यास यापूर्वीच महापालिकेने मान्यता दिली असून, तसा प्रस्तावही “पीएमआरडीए’कडे देण्यात आला होता. त्यानंतर आता या मार्गातील वाघोली-लोहगाव ते पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्पाईन रस्त्यापर्यंतचा 5.7 किलोमीटरचा मार्ग आता पालिका करणार आहे. त्यानुसार सल्लागाराकडून अहवाल तयार करून घेतला असून, मंगळवारी झालेल्या एस्टीमेट कमिटीमध्ये मान्यताही देण्यात आली आहे. हा रस्ता 65 मी. रुंद असेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते असतील. तसेच पावसाळी गटारे आणि विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे. काही ठिकाणी सिग्नल्सची व्यवस्थाही असेल. या कामासाठी 212 कोटी रुपये खर्च असून, पीपीपी तत्वावर क्रेडीट नोटच्या माध्यमातून हा रस्ता विकसित करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.