“करंडक कोण पटकाविणार’ हा विषय ठरणार औत्सुक्याचा
पुणे – महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये “पुरूषोत्तम करंडक’ स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. दि. 27 पासून एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी “भरत’ नाट्य मंदिर येथे रंगणार आहे. गेली काही वर्षे महाअंतिम फेरीचा करंडक पुण्याव्यतिरिक्त अन्य केंद्र पटकावत आहेत. त्यामुळे यावर्षी “करंडक कोण पटकाविणार’ हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या स्पर्धेमुळे लागणारी शिस्त भविष्यात मुलांना उपयुक्त ठरू शकते, असे मत राज्यातील “पुरूषोत्तम’च्या आयोजकांनी व्यक्त केले.
स्पर्धेमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना शिस्त लागली आहे. शिस्तीकडे मुले सकारात्मक दृष्टीने बघत आहेत. सुरुवातीला स्पर्धेसाठी इतके नियम का, असे प्रश्न विद्यार्थी विचारायचे. मात्र आता स्पर्धेच्या नियोजनाबाबत विचारत आहेत, ही सकारात्मक बाब आहे, असे रत्नागिरी केंद्राचे प्रमुख अनिल दांडेकर म्हणाले.
नागपूर केंद्राचे अमरावती हे उपकेंद्र आहे. स्पर्धेचे यंदाचे दुसरेच वर्ष आहे. अमरावतीत युवा महोत्सव होतो; पण एकांकिका स्पर्धा होत नव्हत्या. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जसा वाव मिळत आहे त्याचप्रमाणे प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे गौरी अभ्यंकर यांनी सांगितले.
कोल्हापूरची भाषा रांगडी आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने विविध भागांतील बोलीभाषेत विद्यार्थी एकांकिका सादर करतात. विद्यार्थी प्रमाण भाषा बोलण्याचा प्रयत्न करतानाही दिसून येत आहे, असे कोल्हापूर केंद्राच्या उमा नामजोशी म्हणाल्या.
एकांकिका कशा पद्धतीने सादर करावी याचे विद्यार्थ्यांना सुरुवातीस पुरेसे ज्ञान नव्हते. इतरांची मदत घेऊन विद्यार्थी एकांकिका सादर करीत होते. पण गेल्या काही वर्षांपासून चित्र बदलले आहे. लेखनापासून दिग्दर्शनापर्यंत तसेच तांत्रिक बाजूही विद्यार्थी समर्थपणे सांभाळू लागले आहेत, असे जळगाव केंद्राचे प्रा. हेमंत पाटील यांनी सांगितले.
अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघांचे लॉटस्
पुरुषोत्तम करंडकच्या महाअंतिम फेरीत एकूण 17 संघांचे सादरीकरण होणार आहे. अंतिमफेरीत पोहोचलेल्या संघांचे लॉटस् गुरुवारी सायंकाळी काढण्यात आले. दि. 27 रोजी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय, रत्नागिरी (वन डे सेलिब्रेशन), न्यू कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यायल अहमदनगर (लाली), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद (मॅट्रीक) या एकांकिका सकाळी सादर होणार आहेत. तर, सायंकाळी धरमपेठ एम. पी. देव स्मृती विज्ञान, महा. नागपूर (हिरवीण), एम. जे. कॉलेज जळगाव, राजारामबापू तंत्र महाविद्यालय, इस्लामपूर (एक्सपायरी डेट) लॉट्सच्या सुरुवातीला चिटणीस राजेंद्र ठाकुर-देसाई, खजिनदार सुहास नांगरे, विश्वस्त मंगेश शिंदे यांनी स्पर्धेच्या नियमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी अध्यक्ष अनंत निघोजकर, विश्वस्त ज्योती कुलकर्णी आदी उपस्थित होते.