स्वातंत्र्यासाठी वक्तृत्व

18 व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांचे आगमन भारतात झाले आणि 1885 ला राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली. देश स्वातंत्र्यासाठी अनेक नेते तयार झाले. देशातील सामाजिक व राजकीय बदलत जाणारी स्थिती यामुळे महात्मा गाधीजींची “चले जाव चळवळ’, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असे म्हणणारे लोकमान्य टिळक. “जय जवान जय किसान’ म्हणणारे लालबहादूर शास्त्री.

“वंदे मातरम्‌’ म्हणणारे बंकिमचंद्र. “विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले,’ असे म्हणणारे महात्मा फुले अशा विविध नेत्यानी आपल्या वक्‍तृत्वाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी झंझावती दौरे केले. या 21 व्या शतकात दृक-श्राव्य माध्यमाच्या सुकाळामुळे, समारंभातील वाढत्या संख्येमुळे हौशे, नवशे, गवशे यांच्यामुळे, बोलू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आपले बोलणे, आपले वक्तृत्व अमोघ होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, आवाजाची साधना, वाचन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याचा आलेला अनुभव. अनुभव हा गुरू असतो हे सिध्द करणारा.

मी एका व्याख्यानासाठी गेले आणि हातामध्ये पाण्याने अर्धा भरलेला काचेचा ग्लास मुलांना दाखवून प्रश्न विचारला “मुलांनो, या ग्लासचे वजन किती असेल?” अनेक हात वर आले. त्यातील काही मुले म्हणाली, “पन्नास ग्रॅम, शंभर ग्रॅम, सत्तर ग्रॅम’ अशी सभेच्या वेगवेगळ्या भागांतून उत्तरे आली. पुन्हा मी त्यांना प्रश्न विचारला, “मुलांनो, हा ग्लास असाच धरून ठेवला तर काय होईल? मुले म्हणाली, “तुमचा हात दुखेल’. मी म्हणाले, “अगदी बरोबर. मला एक सांगा या काळात ग्लासचे वजन वाढले आहे का?’ मुले म्हणाली, “नाही.’ मी म्हणाले, “मग पूर्ण दिवस हा ग्लास असाच धरून ठेवला तर काय होईल?’ तोच मुले म्हणाली, “तुमचा हात बधिर होईल. तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणाला, “कदाचित हाताच्या स्नायूंना मोठी दुखापत होईल.’ मी म्हणाले, “अगदी बरोबर. मग सांगा मुलांनो हात दुखायला नको असेल तर, मी काय करायला हवे बरे?’ एका सुरात मुले उद्‌गारली, “मॅडम, तो पाण्याने अर्धा भरलेला ग्लास खाली ठेवावा लागेल’. मी म्हणाले, “अगदी बरोबर, जीवनाच्या प्रवासात भाषण कलेची साधना करीत असताना अनेक प्रश्न, अनेक समस्या भेडसावत असतात. या समस्या, हे प्रश्न सतत डोक्‍यात ठेवले आणि त्यांचा सतत विचार करीत राहिलो, तर आपली विचारशक्ती कुंठित होते. ज्याप्रमाणे हातात सतत पकडलेल्या ग्लासातून निर्माण होणाऱ्या शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते, त्या प्रमाणे सतत समस्यांचा विचार केल्यास मन कमजोर होऊन आपल्या प्रगतीत तो अडथळा ठरू शकतो. त्यामुळे चिंता करण्यापेक्षा चिंतन करा.

काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या, तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. समजण्यासाठी समजून घेणे खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी, अनुभवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाला कसावे लागते. अशा वागण्याने तुम्हाला ताण येणार नाही. तुम्ही ताजे तवाने व्हाल व कोणत्याही आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शकाल. भाषण ही एक कला आहे. भाषण करताना आपल्याला बऱ्याच वेळा त्याचे दडपण वाटते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. (क्रमशः)

प्रा.सुरेखा कटारिया
डॉ. श्‍वेता राठोड

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)