नवी दिल्ली: देशाचे नवे गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी देशाच्या अंतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली. त्या आढावा बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृह सचिव राजीव गौबा, गुप्तचर विभागाचे प्रमुख राजीव जैन आदी उपस्थित होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरमधील आणि विशेषत: सीमेलगतच्या भागांमधील सुरक्षा स्थितीची माहितीही शहा यांना दिली. भारताच्या शेजारी देशांशी संबंधित माहिती रॉच्या अधिकाऱ्यांनी सादर केली. गृहमंत्र्यांनी सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या बैठका नियमितपणे घेण्याची परंपरा दीर्घकाळपासून पाळली जाते. त्यामुळे महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात गृहमंत्र्यांना मदत होते. मागील सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची जबाबदारी यावेळचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांभाळली होती.