पुणे – पावसाळी वाहिन्यांमध्ये ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग बोअर’

पुणे – भूजल पुनर्भरण उपक्रमांतर्गत पावसाळी वाहिन्यांमध्ये “ग्राऊंड वॉटर रिचार्ज होल्स’ (भूगर्भात पाणी जाण्यासाठी खोल बोअरवेल) तयार करण्यात येणार आहे. हा उपक्रम “गेरा डेव्हलपमेन्ट प्रा. लि.’तर्फे प्रायोगिक तत्त्वावर खराडी येथे करण्यात येणार आहे.

दिवसेंदिवस खोल होत चाललेली भूजल पातळी, त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी, पाण्याची कमतरता या सगळ्याचा विचार करून “रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा पर्याय गेल्या काही वर्षांपासून पुढे आला आहे. अनेक गृहसंकुलांनी, सोसायट्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून भूजलपातळी वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचे जास्तीत जास्त जागृतीही करण्यात येत आहे.

मात्र, रस्त्यावर मोठ्याप्रमाणात साठणाऱ्या पाण्याचाही पुनर्भरणासाठी उपयोग होऊ शकतो. रस्त्यावरचे पाणी महापालिकेने बनवलेल्या पावसाळी वाहिन्यांमध्ये जाऊन ते नदी नाल्यांना मिळते. त्याऐवजी हे पाणी थेट भूगर्भात सोडण्याचा उपक्रम या कंपनीतर्फे केला जाणार आहे.

सध्या खराडी येथील रस्त्यांवरील पावसाळी वाहिन्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 200 बोअरवेल्स काढून देण्यात येणार आहेत. जर ही प्रक्रिया यशस्वी झाली तर ती संपूर्ण शहरात राबवण्याचा विचार करता येईल, अशी माहिती महापौर मुक्‍ता टिळक यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

महापौरांना रोपट्यांच्या कुंड्या भेट
घरामध्ये असलेले प्रदूषण कमी करण्यासाठी नासाने प्रमाणित केलेले वृक्ष “सस्टेनेबल इनिशिएटिव्ह’ या स्वयंसेवी संस्थेने महापौर मुक्‍ता टिळक यांना दिले. तसेच त्यांच्या दालनातही त्या रोपट्यांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. घरामध्ये फर्निचर, आलेली धूळ, कुजण्याचे प्रकार या सगळ्यांमधून निर्माण होणारे प्रदूषण कमी व्हावे यासाठी ही वनस्पती उपयोगी ठरते. यामुळे वातावरण शुद्ध राहते. यावर संशोधन झाले आहे. 5 जून या पर्यावरण दिनानिमित्त हे रोपटे असलेल्या कुंड्या महापौरांना दिल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.