डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी पीएमपीत येण्यास इच्छुक नाही? : अधिकारी, कर्मचारी संभ्रमात
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी यांची महिनाभरापूर्वी बदली झाली आहे. मात्र, अद्यापही डॉ. सुर्यवंशी बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नसल्याने ते पीएमपीत येण्यास इच्छुक नसल्याबाबत चर्चा सुरू आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पीएमपीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार नयना गुंडे यांनी सांभाळला. नुकतीच गुंडे यांची पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. मात्र, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी अद्यापही बदलीच्या ठिकाणी हजर झाले नसल्याने नयना गुंडे यांनी पीएमपीएमएलचा पदभार सोडला नाही. महिन्याभरापूर्वी राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या होत्या.
यामधील, बहुतांशी अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर झालेले आहेत. रायगडला जिल्हाधिकारी म्हणून निधी चौधरी हजर झालेल्या असताना डॉ. सुर्यवंशी यांनी अद्यापही पीएमपीएमएलचा पदभार स्वीकारला नसल्याने पीएमपीचे अधिकारी व कर्मचारीही संभ्रमात आहेत.
दहा दिवसांपूर्वी केली होती स्वागताची तयारी
पीएमपीच्या अध्यक्षपदी डॉ. सुर्यवंशी यांची बदली होऊन महिना होत आला आहे. बदली झाल्यानंतर दहा दिवसांनी पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. सुर्यवंशी घेणार असल्याने पीएमपीच्या कार्यालयात स्वागताची तयारी केली होती. मात्र, सदर दिवशी सुर्यवंशी हजर झाले नसल्याचे दिसून आले.
साइड पोस्टिंग समजत असल्याने अधिकाऱ्यांना वावडे
पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक हे आएएएस दर्जाचे पद आहे. मात्र, या पदाला पहिल्यापासून साईड पोस्टींग समजले जाते. त्यामुळे, राज्यात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्सम वरिष्ठ पदावर काम केलेले अधिकारी पीएमपीएमएलमध्ये येण्यास उत्सूक नसल्याचे दिसून येते.
पीएमपीची गाडी रुळावर कधी?
पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नयना गुंडे यांची दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, पीएमपीएमएलचा गाढा हाकताना सलग तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी अधिकाऱ्यांची बदली होत असल्याने पीएमपीचे अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. नवीन अधिकारी रुजू झाल्यानंतर काही प्रकल्पांना गती मिळते. तर, काही प्रकल्प बंद होतात. त्यामुळे, तीन वर्षांचा कार्यकाल पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदावरील अधिकाऱ्यांनी पूर्ण करण्याची गरज आहे.