पुणे – आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणाऱ्या पृथा वर्टीकर हिने अपेक्षेप्रमाणे दोन गटात विजेतेपद मिळवले आणि बालुफ ऑटोमेशन चषक टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला. कौस्तुभ गिरगावकर व नैशा रेवसकर यांनी देखील दुहेरी धमाका केला. पुरुषांच्या एकेरीत प्रणव घोलकर विजेता ठरला.
त्याने आदित्य जोरी याचा 9-11, 11-7, 11-8, 11-5, 7-11, 14-16, 11-6 असा पराभव केला. पृथाने मुलींच्या 19 वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवताना धनश्री पवार हिच्यावर 9-11, 11-9,12-10, 8-11, 11-6, 11-6 असा विजय मिळवला. पाठोपाठ तिने महिलांच्या एकेरीत नैशा रेवसकर हिला 11-9, 11-4, 11-4, 11-7 असे निष्प्रभ केले. नैशा हिने या स्पर्धेतील तेरा व पंधरा वर्षांखालील गटात अजिंक्यपद मिळवले. मुलांच्या 19 वर्षांखालील गटात कौस्तुभ गिरगावकरने प्रणव घोलकर याच्यावर 8-11, 11-2, 14-12, 5-11, 10-12, 11-8, 11-9 असा संघर्षपूर्ण लढतीनंतर विजय मिळवला. कौस्तुभने याआधी या स्पर्धेतील पंधरा वर्षांखालील गटातही विजेतेपद मिळवले होते.
नैशा हिने मुलींच्या तेरा वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवताना आद्या गवात्रे हिच्यावर 11-4, 11-8, 11-9 असा विजय प्राप्त केला. तिने पंधरा वर्षांखालील गटातही विजेतेपदावर आपली मोहोर नोंदवली. या गटात नैशाने अंतिम फेरीत रुचिता दारवटकर हिचे आव्हान 11-9, 11-9, 11-8 असे सहज परतवले.पंधरा वर्षांखालील गटात गिरगावकर याने शौरेन सोमण याला 11-9, 11-7, 11-9 असे सरळ तीन गेम्समध्ये नमवले. तेरा वर्षांखालील गटात श्रेयस माणकेश्वरने अनुज फुलसुंदर याचा 11-3, 11-8, 5-11, 11-3 असा पराभव केला.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बालुफ ऑटोमेशनचे व्यवस्थापकीय संचालक व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. उदय भालचंद्र, स्मिता बोडस, श्रीराम कोनकर, श्रीकांत अंतुरकर, अजेय सिधये, डॉ. मोहन उचगावकर, सुरेंद्र देशपांडे, मनीषा बोडस, अविनाश जोशी यांच्या हस्ते झाला. आश्लेषा बोडस यांनी सूत्रसंचालन केले.