15 हजार कोटी रुपयांचा निधी असावा

छोट्या उद्योगांसाठी रिझर्व्ह बॅंकेच्या समितीची शिफारस

मुंबई – देशातील छोट्या उद्योगांनी देशांतर्गत बाजारपेठेत आणि निर्यात पेठेत उत्तम कामगिरी केलेली आहे.आगामी काळातही विकासदर आणि रोजगार वाढायचा असेल तर छोट्या उद्योगासाठी 15 हजार कोटी रुपयांचा निधी निर्माण करण्याची गरज असल्याचे रिझर्व बॅंकेने नेमलेल्या यू. के. सिन्हा समितीने म्हटले आहे.

या निधीमुळे छोट्या उद्योगांना भांडवल सुलभता निर्माण होईल. या क्षेत्रात नावीन्य निर्माण होण्यास मदत होईल, असे समितीने म्हटले आहे. त्या क्षेत्रातील निर्यातीचे योगदान तब्बल 40 टक्‍के आहे. कमी गुंतवणुकीतून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो याची दखल या अहवालात घेण्यात आलेली आहे.

गेल्या काही महिन्यापासून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्या अनुषंगाने छोट्या उद्योगांना चालना दिल्यास कमी भांडवलात अधिक रोजगार निर्माण होऊ शकेल.

दरम्यान, केंद्र सरकार लवकरच छोट्या उद्योगांमध्ये नावीन्य निर्माण व्हावे याकरिता एक पोर्टल सुरू करणार आहे. या पोर्टलवरील माहितीचा छोट्या उद्योगांना उपयोग होऊ शकेल असे लघु उद्योग मंत्रालयाचे सचिव अरुण पांडा यांनी सांगितले. लघुउद्योगांवर आगामी काळात अधिक भर देण्याचे धोरण ठरविले आहे. त्या दृष्टिकोनातून या उद्योगासाठी आगामी काळात अनेक उपाययोजना केल्या जाणार आहेत त्याचे प्रतिबिंब लवकरच जाहीर होणार या अर्थसंकल्पात पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. जीएसटीचा या उद्योगांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.