पेमेंटसंबंधीची माहिती देशातच साठवावी – रिझर्व्ह बॅंक

नवी दिल्ली – पेमेंट संबंधित माहिती देशातच साठवून ठेवावी. जर ही माहिती परदेशात असेल तर ती शक्‍य तितक्‍या लवकर देशात आणावी अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना रिझर्व्ह बॅंकेने संबंधित कंपन्यांना दिलेल्या आहेत.

बॅंकेने म्हटले आहे की, या संदर्भात सरकार किंवा रिझर्व्ह बॅंकेचे धोरण स्पष्ट आहे. एप्रिल 2018 रोजी या संबंधातील सूचना जारी केल्या होत्या. त्यामुळे सर्व व्यवस्था पुरवठादारांनी ही माहिती भारतात साठविणे अपेक्षित आहे. फारच आवश्‍यकता असेल तर या माहितीवरील प्रक्रिया परदेशात केली जाऊ शकते.

मात्र प्रक्रियेनंतर ही सर्व माहिती भारतातच साठविली जाणे अपेक्षित असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. याबाबत काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हरकत घेतली होती. मात्र सरकारने आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने ग्राहकांची माहिती भारतातच राहणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.