लखनऊ – विविध प्रकारच्या फळांपासून विशेषता द्राक्षापासून मद्यनिर्मिती करणे एक सर्वसाधारण बाब असली तरी आता उत्तर प्रदेश सरकारने चक्क फळांचा राजा असलेला आंब्यापासून मद्य निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. बनारस हिंदू विद्यापीठातील संशोधक लंगडा आणि दशहरा जातीच्या आंब्यावर विशेष संशोधन करत आहेत.
या संशोधनाला चांगले यश मिळाले असून या संशोधनातील निष्कर्ष संशोधकांनी विद्यापीठाच्या येथील एथिकल कमिटीकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. एथिकल कमिटीने या संशोधनाला मंजुरी दिल्यानंतर आणखी काही संशोधनाच्या पायऱ्या पूर्ण करून या संशोधनाला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
आंब्यापासून तयार होणाऱ्या मद्याचे वैशिष्ट्य असे आहे की एकाच वेळी ते दवा आणि दारू या प्रकारे काम करणार आहे कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे हृदयविकार आणि त्वचा विकारांसाठी हे उपकारक ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. आंब्यापासून मद्य निर्मितीचा हा प्रयोग व्यावसायिकदृष्ट्या सफल झाला तर शेतकऱ्यांना त्याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. कारण त्यांच्या आंबा पिकाला चांगले पैसे मिळणे शक्य होणार आहे.
बनारस हिंदू विद्यापीठातील सेंटर ऑफ फुड अँड सायन्स टेक्नॉलॉजी येथील संशोधक सतत अन्न प्रक्रियेबाबत संशोधन करत असतात दरवर्षी सुमारे 30 ते 40 टक्के आंबे वापराविना वाया जातात ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या आंब्याचा वापर मद्य निर्मिती करण्यासाठी होऊ शकतो का त्या दृष्टिकोनातून संशोधन सुरू केले आणि त्यांच्या संशोधनाला यश मिळाले आहे.
आंब्याच्या विविध सहा जातींवर संशोधन केले असता लंगडा आणि दशहरा या जातीचे आंबे मद्यनिर्मितीसाठी अधिक उपयुक्त ठरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या आंब्या पासून जी मद्यनिर्मिती होईल त्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण दहा टक्के असणार आहे ते बियर पेक्षा जास्त असले तरी द्राक्षापासून तयार होणाऱ्या मद्यपेक्षा हे अल्कोहोलचे प्रमाण कमी असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.