सिडनी – ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलयाने अती मद्यपान केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यामुळे आता त्याच्यावर प्रचंड टीका सुरु झाली असून त्याला पुढील काही काळ ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान देण्यात येऊ नये अन्यथा ऑस्ट्रेलिया क्रिकेटची बदनामी हइल, अशा शब्दात टीकाकारांनी मॅक्सवेलला निशाणा बनवले आहे.
अर्थात ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने या चर्चा उथळ असून एखाद्या घटनेमुळे एखादा खेळाडू कायमचा वाईट ठरू शकत नाही. त्याने वर्तणूक सुधारण्याची हमी दिली तर त्याचा संघात निश्चितच समावेश होइल, असे संकेतही ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने दिले आहेत.
भारतात गेल्या वर्षी पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत मॅसवेलमुळेच ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरी पोहोचला होता. तसेच याच स्पर्धेत मॅक्सवेलने नाबाद २०० धावांची खेळी करत एकदिवसीय सामन्यांच्या कारकीर्दीतील पहिले द्विशतक फटकावले होते. त्यानंतर बिग बॅश लीगमध्ये त्याच्या नावाची चर्चा रंगली. बिग बॅश लीगमध्ये पराभवानंतर त्याने मेलबर्न स्टार्सचे कर्णधारपद सोडले. तसेच 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून त्याला डावलण्यात आले.
एकापाठोपाठ एक मनाविरुद्ध घटना घडत असताना ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मॅक्सवेलने एका पार्टीत क्षमतेपेक्षा जास्त मद्यपान केले. त्यामुळे तो अस्वस्थ झाला आणि बेशुद्ध पडला. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. काही वेळानंतर प्रकृती स्थिर झल्यावर हे वृत्त माध्यमांपर्यंत जाऊ नये यासाठी त्याने रुग्णालयातून चक्क पळ काढला.