लोकप्रतिनिधींनी दाखवले विकासाचे “गाजर’

नारायणगाव -विद्यमान लोकप्रतिनिधींनी तालुक्‍यातील जनतेला गेल्या पाच वर्षांत फक्‍त विकासाचे गाजर दाखवले असल्याने या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून कायमचे घरी बसवा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव काळे यांनी केले.

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांचा गावभेट दौरा वळणवाडी, आनंदवाडी, वारूळवाडी याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तर वारुळवाडी येथील सभेत काळे बोलत होते. यावेळी जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, गुलाबशेठ नेहरकर, सुजित खैरे, संजय वारुळे, उपसरपंच सचिन वारुळे, जंगल कोल्हे, विपुल फुलसुंदर, विनायक भुजबळ, नितीन भालेकर, संतोष शिंदे, विशाल पवार, दशरथ घुले, अशोक फुलसुंदर, अनिकेत भुजबळ, दीपक भुजबळ, सतीश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

रमेश भुजबळ म्हणाले की, शिवसेना-भाजप सरकारने शेतकऱ्यांना दुधाचे भाव अतिशय कमी दिलेले असताना दुसरीकडे सुग्रासचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत. या सरकारच्या काळात आत्महत्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. या सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणे- घेणे नाही. त्यामुळे या सरकारला आणि त्यांच्या उमेदवारांना घरी बसवण्याची हिच योग्यवेळ आहे.

अतुल बेनके म्हणाले की, पिंपळगाव जोगे धरणाचे कार्यालय अहमदनगर जिल्ह्यात गेले असताना आपण आळेफाटा येथे सात दिवस आंदोलन केले. या आंदोलनाची दखल या सरकारने घेतली आणि हे कार्यालय परत आले आहे. हे लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी स्वनिधी दिला, असे सांगत आहेत; परंतु तसे काहीही नसून स्वनिधीचा खर्च शासनाकडून वसूल करून जनतेची फसवणूक करीत आहेत.

शासनाने राज्याला दुष्काळ म्हणून जाहीर केले असताना पाण्याचे नियोजन न करता धरणातील सर्व पाणी या लोकप्रतिनिधींनी खाली सोडले; मात्र आपल्या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पाणी दिले नाही. व जे कोणी पाणी उचलत होते, त्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद केला. पाणी न मिळाल्याने शेतीतील उभी पिके जळाली. लोकप्रतिनिधी हे पाणी नियोजनात निष्क्रिय ठरले.
-अतुल बेनके, उमेदवार, जुन्नर विधानसभा मतदारसंघ.

Leave A Reply

Your email address will not be published.