कुरकुंभ(प्रतिनिधी) – कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीमध्ये पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला होता, यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये खळबळ उडाली होती. या करोनाबधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व सात जणांचा अहवाल मंगळवारी (दि. 2) निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रासगे यांनी दिली.
सुरक्षितेच्या दृष्टीने करोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील सात जणांचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे औद्योगिक वसाहतीमधील कामगार तसेच कुरकुंभकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई-अंबरनाथ येथून कोरोनाबाधित रुग्ण हा कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये दि. 25 मे रोजी कामानिमित्त आला होता, मात्र त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याची करोना तपासणी केली असता त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन, कामगार व स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्याच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
प्रशासन सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन डॉ. अशोक रासगे यांनी केले आहे.