पुणे : सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) घेतला आहे. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार 15 ते 20 जून दरम्यान होणार होती. आता मात्र अर्जच 15 जूनपर्यंत स्वीकारण्यात येणार असल्याने नेटची परीक्षा लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
“एनटीए’ मार्फत नेट परीक्षा देशभरात घेतली जाते. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी 31 मे पर्यंत मुदत होती. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास अडचणी येत्या होत्या. त्यामुळे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होत होती. आता “एनटीए’ने मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.
त्याचप्रमाणे सीएसआरआय-यूजीसी नेट, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी आणि एमबीए प्रवेश परीक्षेसाठी आणि इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रीसर्च परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात आले आहे. त्यांनाही 15 जूनपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, “एनटीए’ने नेट परीक्षा जुन महिन्यात घेण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार काही विद्यार्थ्यांनी अर्ज केले आणि परीक्षेची तयारी करीत होते. आता अर्जासाठी कालावधी वाढविण्यात आल्याने जून महिन्यात परीक्षा होणे कठीण आहे. त्यामुळे नेट परीक्षेची तारीख पुढे ढकलावी लागणार आहे. नेट परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.