मुंबई – रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने बुधवारी पॉलिसी रेपो दरात 50 बेस पॉईंट्सने वाढ केली आहे. त्यामुळे हा दर आता 4.9 टक्के इतका झाला आहे. रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज 6.7 टक्के इतका वर्तवला आहे. रेपो दरातील वाढीमुळे सामान्य कर्जावरील हप्त्यांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे येत्या काही काळात त्याचा घरांच्या विक्रीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज नव्या रेपा दराची ही घोषणा केली. ते म्हणाले की, चलनविषयक धोरण समितीने तत्काळ प्रभावाने पॉलिसी रेपो दर 50 बेस पॉईंट्सने वाढवून तो 4.90 टक्के इतका करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
परिणामी, स्थायी ठेव सुविधा (एसडीएफ) दर 4.65 टक्के आणि सीमांत स्थायी सुविधा (एमएसएफ) दर आणि बॅंक दर 5.15 टक्के इतका राखण्यात आला आहे. आर्थिक विकासाला चालना देताना महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे दास यांनी नमूद केले.
चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बॅंकेने पॉलिसी रेपो दरात केलेली ही दुसरी वाढ आहे. गेल्या महिन्यात, या बॅंकेने पॉलिसी रेपो दर 40 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.40 टक्क्यांनी वाढवला होता. त्यामुळे हा दर 4.4 इतका झाला होता.गेल्या दोन वर्षांतील पॉलिसी रेपो दरातील ही पहिली वाढ होती. रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बॅंक अन्य बॅंकांना जे अल्पमुदतीचे कर्ज देते त्यावरील व्याजदर असतो.
आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज 6.7 टक्के इतका वर्तवला आहे. या आधी चालू आर्थिक वर्षात 5.7 इतका महागाईचा दर राहील असे या बॅंकेने म्हटले होते. पण सध्याच्या एकूण स्थितीचा आढावा घेतल्यानंतर देशाची महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे या निष्कर्षावर रिझर्व्ह बॅंक आली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महागाई दर तब्बल 7.5 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या तिमाहीत तो 7.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तिसऱ्या तिमाहीसाठी 6.2 टक्के आणि चौथ्या तिमाहीसाठी महागाई किंचीत घटून ती 5.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे.