RBI Reop Rate । भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने या आर्थिक वर्षामधील पहिले पतधोरण जाहीर केलंय. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची अधिक माहिती दिलीय. यंदादेखील रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. आरबीआयकडून मागील वर्षाप्रमाणे यंदादेखील रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलाय. याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती.
आर्थिक वर्ष 2024-25 ची पहिली बैठक RBI Reop Rate ।
रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची ही बैठक 3 एप्रिल रोजी सुरू झाली होती. त्याची सांगता आज झाली. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, किरकोळ महागाई सध्याच्या मालिकेतील नीचांकी पातळीवर आली असली तरी अन्नपदार्थांच्या बाबतीत महागाईची स्थिती अनिश्चित आहे.
कर्जधारकांना दिलासा, ईएमआय महागणार नाही RBI Reop Rate ।
गेल्या वर्षभरपासून आरबीआयने रेपो रेटमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे यावेळी काय होणार? असे विचारले जात होते. रेपो रेट वाढवण्यात आला असता तर त्याची थेट झळ सामान्य कर्जधारकांना बसली असती. रेपो रेटमध्ये वाढ झाली असती तर कर्जधारकांच्या ईएमआयमध्ये वाढही वाढ झाली असती. मात्र आरबीआयने रेपो रेट जैसे थेच ठेवल्यामुळे कर्जधारकांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे.
चलनविषयक धोरण समितीच्या एकूण सहा बैठका प्रत्येक आर्थिक वर्षात दोन महिन्यांच्या अंतराने होतात. 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष 2024-25 साठी एमपीसीची ही पहिली बैठक होती. त्याआधी, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या सर्व सहा बैठकांमध्ये रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला होता.
रेपो रेट म्हणजे काय?
भारतीय रिझर्व्ह बँक देशातील व्यापारी बँकांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्जाच्या रुपात पैसे देते. व्यापारी बँकांना हे पैसे परत करावे लागतात. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना ज्या व्याजदराने पैसे देते, त्यालाच रेपो रेट म्हणतात. रेपो रेट वाढवल्यास व्यापारी बँका सामान्य लोकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करतात. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसते.