‘पवित्र’ पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करणार

उमेदवारांवर अन्याय होऊ देणार नाही : शिक्षण आयुक्‍तांच्या स्पष्टीकरणाने दिलासा

पुणे – शासनाच्या शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर निर्माण झालेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात येणार आहेत. उमेदवारांवर भरती प्रक्रियेत कोणत्याही स्वरुपाचा अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून “पवित्र’ पोर्टलबाबत उमेदवारांकडून बऱ्याचशा तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र, यावर निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी धाडस दाखविले नाही. शिक्षण आयुक्त एका महिन्यासाठी पंजाबच्या लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर गेले होते. ते सोमवारी (दि.27) पुन्हा रुजू झाले. ते आल्याचे समजताच सकाळपासून उमेदवारांनी कार्यालयात गर्दी केली होती. आयुक्तांनी सर्व उमेदवारांचे गाऱ्हाणे ऐकूण घेतले. प्रत्येक उमेदवारांने स्वतंत्रपणे अडचणीबाबतचा अर्ज दाखल करावा. त्याची योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्तांकडून उमेदवारांना सांगण्यात आले.

पोर्टलवर 1 लाख 23 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. शासकीय व खासगी शाळांच्या एकूण 1 हजार जाहिराती पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्याद्वारे शिक्षकांच्या 12 हजार रिक्त जागा दर्शविण्यात आल्या आहेत. 22 मेपासून विद्यार्थ्यांना शाळांचा पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, बहुसंख्य उमेदवारांचे लॉग-इनच होत नसल्याचे उघडकीस आले आहे. काही उमेदवारांना आता माहिती चुकीची भरली असल्याचे निदर्शनास आले असून ती दुरुस्त करण्याची संधी मिळावी, अशी मागणी उमेदवारांकडून होऊ लागली आहे.

सुमारे 10 ते 12 हजार उमेदवारांनी अर्ज स्वप्रमाणित करुन घेतलेच नाहीत. ड्राफ्ट कॉपीची प्रिंट आलेली असताना त्याला स्वप्रमाणित कॉपी समजून घेतल्याच्या चुका उमेदवारांकडून झाल्या आहेत. माध्यम, नाव, आरक्षण प्रवर्ग, नॉन क्रिमीलेयर याबाबतच्या नोंदी करताना उमेदवारांनी खूप चुका केल्याचे उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांवरून स्पष्ट झाले आहे. 40 हजार उमेदवारांना पवित्र पोर्टलवर प्राथमिक नोंदणी करण्याचा विसर पडला होता. आता या उमेदवारांना जाग आली आहे. मात्र, नवीन नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना आता लगेच संधी उपलब्ध करुन देण्यात नाही, असेही शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तक्रारींवर तोडगा काढणार
पवित्र पोर्टलबाबतच्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी “एनआयसी’मध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक, एनआयसीचे अधिकारी यांची विशेष बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या तक्रारीवर तोडगा काढण्यात येईल. उमेदवारांना अर्ज स्वप्रमाणिक करण्यासाठी व माहितीत दुरुस्ती करण्यासाठी दोन-तीन दिवसांसाठी पुन्हा एकदा अखेरची संधी देण्याचा विचार करण्यात येईल. त्याबाबतच्या सूचना पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येतील. शाळांचा पसंतीक्रम नोंदविण्याचीही मुदत वाढवावी लागणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.