आत्तापर्यंत प्रेक्षकांनी अभिनेता रणवीर सिंहच्या वेगवेगळ्या भूमिका पाहिल्या आहेत. रणवीरच्या “बॅन्ड बाजा बारात’ ते अगदी “गली बॉय’ या चित्रपटातील सर्वच भूमिकांनी प्रेक्षकांवर छाप पाडली. तो आता लवकरच एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे.
त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव “जयेश भाई जोरदार’ असे असून मनिष शर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर पटकथा दिव्यांग ठक्कर हे करणार आहेत. “83′ चित्रपटानंतर या चित्रपटाच्या शूटिंगला रणवीर सुरुवात होणार आहे. याबाबत चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी अधिकृत माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
दरम्यान, आगामी “83′ या चित्रपटात रणवीर सध्या व्यस्त आहे. या चित्रपटात तो कपिल देवची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 1983 साली झालेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित आहे. या चित्रपटात “83’च्या वर्ल्डकपचा थरार पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण झळकणार असल्यामुळे रणवीर आणि दीपिकाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.