गंजबाजार, घासगल्ली, नवी पेठेतील अतिक्रमणे हटविली

नगर – शहरातील बाजारपेठेत होणारी गर्दी पाहून, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने व पोलीस प्रशासनाने बुधवारी (दि.13), व आज सलग दुसऱ्या दिवशी गंज बाजार, घास गल्ली, नवी पेठेतील अतिक्रमण हटविले. त्यामुळे या परिसराने मोकळा श्‍वास घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशीच कारवाई 25 दिवस सुरू राहणार आहे.

पुन्हा अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर दंडात्माक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले. नगर शहरातील अतिक्रमणे हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत असली तरी ती तात्पुरती मलमपट्टी ठरते, असा अनुभव आहे. या पार्श्‍वभूमीवर वाढत्या तक्रारींची दखल घेऊन मनपाने कालपासून (बुधवार) शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे.

सुमारे महिनाभर ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सुरुवातीला शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे मोकळी करण्यात येणार आहेत. कापडबाजारातील अतिक्रमणे, हातगाडी विक्रेत्यांचा सुळसुळाट यामुळे या परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे ऐन सणासुदीत या भागात खरेदीसाठी जाण्यास ग्राहक धजावत नाहीत. परिणामी व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर आज कापडबाजारात धडक मोहीम राबवून वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या विक्रेत्यांना हटवून पक्के ओटेही काढण्यात आले. त्यामुळे या भागाने मोकळा श्‍वास घेतला आहे. दोन ट्रक, एक जेसीबी व सुमारे चाळीसजणांचा लवाजमा असलेले अतिक्रमण हटाव पथक काम करीत आहे. नगरमध्ये लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. शहरातून जाणाऱ्या सर्वच महामार्गांवर अतिक्रमणांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमणे हटविल्यानंतर प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.