मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य करत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला आहे. दुसरीकडे सरकारमधील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, आमदार छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सातत्याने विरोध करत आहेत. त्यामुळे शिंदे गटाने छगन भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारत त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
छगन भुजबळ सातत्याने मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधताना संजय गायकवाड म्हणाले की, छगन भुजबळ हे मराठा समाजाच्याविरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत आणि हे योग्य नाही. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये. त्यांची हकालपट्टी करावी. मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते, असे असतानाही भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
मागच्या 70 वर्षांत मराठा समाजाच्या नोंदी दाबून ठेवल्यामुळे समाजाचे नुकसान झाले आहे. जर मराठा समाजाच्या नोंदी मिळत असतील तर त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. त्यांच्या एका मंत्रिपदाने सरकारला काहीही फरक पडत नाही. त्यांची एकट्याची भूमिका ही सरकारची नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचीही नाही, असेही संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.