अर्ध्या तासात ब्रेकडाऊन काढा, अन्यथा कारवाई

पुणे – बस मार्गावर बंद पडल्यानंतर त्या बसेसची दुरुस्ती करण्यासाठी दुरुस्तीची गाडी वेळेवर पोहोचत नसल्याची बाब पीएमपीएमएल प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल घेत गाडी पोहोचण्यासाठी ठराविक कालावधी ठरवून देण्यात आला आहे. या कालावधीत ही गाडी न पोहोचल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई होणार आहे.

पीएमपीएमएलच्या बसेस मार्गावर बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असून अन्य बस उपलब्ध नसल्यास त्यांना उर्वरीत प्रवासाचे पैसे परत देण्याची वेळ येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या महसुलात घट होत आहे. मात्र, हे वास्तव असतानाही आणि वारंवार सूचना देऊनही संबंधित विभागाच्या वतीने ही नादुरुस्त बस दुरुस्त करण्यासाठी मार्गावर पाठविण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडत आहे. त्याचा त्रास नादुरुस्त बसेसच्या चालक आणि वाहकांनाही सहन करावा लागत आहे. शिवाय, ही बस गर्दीच्या ठिकाणी बंद पडली असल्यास तेथील वाहतुकीवरही परिणाम होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनाही दंड द्यावा लागत आहे.

या प्रकाराची पीएमपीएमएल प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार नादुरुस्त बसच्या जवळ पोहोचण्यासाठी त्या त्या डेपोपासून ठराविक कालावधी ठरवून देण्यात आला आहे. त्यानुसार नादुरुस्त बसेसच्या चालकाचा अथवा वाहकाचा नियत्रंण कक्षाला दूरध्वनी आल्यानंतर तेव्हापासून त्या बसच्या जवळ पोहोचण्यासाठी कालावधी ठरवून दिला आहे. या कालावधीत संबंधित ठिकाणी न पोहोचल्यास त्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.