15 लाख देण्याचे कधीच बोलले नव्हते

2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच बोलले नव्हते, असा दावा करतानाच कोणताही व्हिडीओ किंवा भाजपचे संकल्पपत्र काढून बघा, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी दिले. शिवसेना भाजपमध्ये अनेक कुरबुरी झाल्या. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांचे कायम एकमत आहे. आम्ही कधीच एकमेकांपासून दूर गेलो नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

एका मुलाखतीत विविध प्रश्‍नांना मुख्यमंत्र्यांनी रोखठोख उत्तरे दिली. वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) भ्रष्टाचार बंद झाला असून हा सर्व पैसा आता सरकारी तिजोरीत आला आहे, असा दावा करतानाच हा पैसा विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भाजपने दिलेल्या 540 आश्‍वासनांपैकी 520 आश्‍वासने पूर्ण झाली आहेत तर वीस आश्‍वासने पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, असेही ते म्हणाले. भाजपच्या संकल्पपत्रात राम मंदिरांचे आश्‍वासन दिले आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, राम मंदिर हा आस्थेचा प्रश्‍न आहे. सर्वोच्य न्यायालयात राम मंदिराच्या बाजूने निकाल लागेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. मात्र आम्हाला सरकारी यंत्रणांचा वापर करायचा नव्हता. जर सरकारी एजन्सीचा वापर केला असता तर अनेक पक्षांचे नेते “बाहेर’ राहिले नसते असा इशारा देतानाच, मात्र आम्हाला सरकारी यंत्रणाचा वापर करायचा नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले. बालाकोटवर हिंदुस्थानी हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्यांना भाजपने कधीही देशद्रोही म्हटले नाही. मात्र सैन्याने दिलेल्या माहितीवर आतापर्यंत कोणीही अविश्‍वास दाखवलेला नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यात जातीभेदाचे विष पसरवत असल्याचा आरोप करून मुख्यमंत्री म्हणाले की, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष शरद पवार चालवत आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कशी वागणूक दिली हे धनगर समाजानेही पाहिले याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. राज ठाकरे हे वाट चुकलेले नेते असून ते आता पूर्णपणे वैफल्यग्रस्त झाले आहे. मनसे आता “उनसे’झाली आहे. उनसे म्हणजे ‘उमेदवार नसलेली सेना’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.