नवीन पुलाचे काम अपूर्ण; ये-जा करताना मोठी कसरत
ढेबेवाडी (वार्ताहर) – गेले आठ दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ढेबेवाडी भागातील ओढे, नाले भरून वाहत आहेत. वांग नदीला आलेल्या पुरात येथील जुना पूल पाण्याखाली जातो तर नवीन पुलाचे काम अपूर्ण स्थितीत असल्याने काढणे गावच्या नागरिकांना पुलाच्या स्लॅबसाठी टाकलेल्या लोखंडी सळीवरून मोठी कसरत करून ये-जा करावी लागत आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाटण तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. ढेबेवाडी खोऱ्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे या खोऱ्यातील नदी, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ओढ्यांना पूर आला आहे. येथील काढणे गावाला जोडणारा पूल उंची कमी असल्याने पावसाळ्यात हमखास तो पाण्याखाली जातो. त्यामुळे काढणेसह तुपेवाडी गावच्या दळणवळणाचा प्रश्न आवाचून उभा ठाकला आहे.
हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जुन्या पुलानजीक नवीन पुलाचे काम चालू आहे. मात्र, ते काम पूर्ण झाले नाही. अशा परिस्थितीत येथील नागरिक आपला जीव धोक्यात घालून पुलावरून ये-जा करत आहेत. पुलाचे काम अपूर्ण असताना लोक ये-जा करत असल्यामुुळे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.