स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण ठेवावे

खा. धैर्यशील माने : वडगाव (ज. स्वा.) येथे खाशाबा शिंदे प्रतिष्ठानच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन

पुसेसावळी  – स्वातंत्र्य चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खा. धैर्यशील माने यांनी केले. वडगाव (ज. स्वा.), ता. खटाव येथे हुतात्मा दिनानिमित्त खाशाबा शिंदे प्रतिष्ठानच्यावतीने झालेल्या हुतात्मा अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, वर्धन ऍग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम, ना. राम शिंदे यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र घाडगे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, सागर शिवदास यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. माने म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून हजारो नागरिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. युवा पिढीने त्यांच्या त्यागाचा आदर्श घेऊन त्यांची विचारधारा जोपासली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात असला तरी शंभर टक्‍के योगदान द्या तरच देशाची उन्नती होईल. हुतात्मा स्मारक विकासासाठी खासदार फंडातून 11 लाख रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. नितीन बानुगडे म्हणाले की, वडगावला आरोग्य सुविधा मिळू शकत नाहीत, हे दुर्दैव आहे. अधिकारांची जाणीव करून दिली तरच सुधारणा घडते. जाणतेपण शिक्षणातून मिळते. घेतलेला निर्णय चुकेल या भीतीपोटी माणसे निर्णय घेत नाहीत; परंतु घेतलेला निर्णय योग्य होता, हे सिद्ध करणारी माणसे यशस्वी होतात. युवकांनी विधायक कामांसाठी पुढे यावे.

धैर्यशील कदम म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा दिनाचे (9 सप्टेंबर) महत्त्व आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी त्या काळात प्रतिसरकार निर्माण केल्याने ब्रिटिशांविरोधात जनसामान्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता. अनेकांनी प्राणांची बाजी लावून लढा दिला. त्यांच्या प्रेरणादायी स्मृती जपण्यासाठी हुतात्मा स्मारके उभी आहेत. अशा हुतात्म्यांच्या भूमीत जन्माला आलो, याचा अभिमान आहे. प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करू.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिकांच्या उत्तराधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महेश घार्गे, दादासाहबे कोकाटे, सागर पाटील, प्रवीण घार्गे, जगन्नाथ भोसले,तहसीलदार अर्चना पाटील, गटविकास अधिकारी रमेश काळे, अमोल होनराव, अमोल शिंदे, नितीन भोसले, सुहास पिसाळ उपस्थित होते. सुहास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. आझाद शिकलगार यांनी सूत्रसंचालन केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×