विसर्जन मिरवणुकीवरून नवीन वाद

काही मंडळांच्या मिरवणूक लवकर सुरू करण्याची मागणी


मानाच्या मंडळांकडून मागणीला विरोध

पुणे – मानाच्या गणपतींनी यंदा गणेश विसर्जन मिरवणूक लवकर सुरू करावी. अन्यथा अन्य मंडळांना लवकर विसर्जन करण्याची संधी द्यावी, अशी मागणी काही सार्वजनिक गणेश मंडळांकडून करण्यात येत आहे. या मागणीला मानाच्या गणपती मंडळांनी विरोध केला आहे, यामुळे यंदा विसर्जन मिरवणुकीवरून नवीन वाद सुरू झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मानाच्या गणपतींना मिरणुकीत प्रथम स्थान दिले जाते. या मंडळांच्या मिरवणुकीला सकाळी 10 च्या सुमारास टिळक पुतळ्यापासून सुरुवात होते. मात्र, यंदा ही मिरवणूक सकाळी 7 वाजता सुरू करावी. अन्यथा त्याआधी जाण्याची तयारी असणाऱ्या मंडळांना मिरवणूक सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी पूर्व भागांतील मंडळांकडून करण्यात येत आहे. मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांना उशीर होत असल्याने आम्हांला थांबून राहावे लागते. त्यामुळे पूर्व भागांतील काही मंडळे आणि महोत्सवी मंडळांकडून याबाबत पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. पुणे बढाई समाज ट्रस्ट, गणेशपेठ पांगुळआळी ट्रस्ट, होनाजी तरूण मंडळ, सहकार तरूण मंडळ आदी मंडळांचा यामध्ये समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासंदर्भात गेले तीन दिवस पोलीस प्रशासनाने पूर्व भागांतील मंडळांकडून चर्चा करण्यात येत आहे. मात्र, विसर्जन मिरवणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाही याबाबत मंगळवारी रात्रीपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नव्हता. मानाच्या गणपती मंडळांनी अनेक वर्षांपासून सुरू असणारी परंपरा मोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे.

या प्रकाराबाबत मानाच्या गणपती मंडळांनी देखील पोलीस प्रशासनाला पत्र दिले आहे. विसर्जन मिरवणूक सुनियोजित आणि शिस्तबद्ध व्हावी यासाठी अनेक वर्षांपूर्वी तर्कसंगत क्रमवारी निश्‍चित केली आहे. या प्रकारामुळे सुव्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाची असंदिग्धता कायम राहिल्यास अथवा विसर्जनाच्या सुव्यवस्थेत बदल केल्यास आम्ही मूर्तिंचे विसर्जन करणार नाही, असे संबंधित पत्रात नमूद केले आहे.

विसर्जन मिरवणुकांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात येत आहे. मानाच्या गणपतींची मिरवणूक परंपरेनुसार होत आली आहे. परंपरेला विनाकारण विरोध केला जात आहे. अनेक वर्षांपासून पुण्यात ही परंपरा कायम आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड आम्ही कसा पडू देऊ.
– श्रीकांत शेटे, अध्यक्ष, श्री कसबा गणपती मंडळ


मागच्या वर्षी प्रमाणे मिरवणुका यावर्षी पार पडतील. यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
– डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्‍त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)