नवी दिल्ली – रेमडेसिवीरमुळे करोनाबाधितांना व्हेंटीलेटरची गरज कमी झाल्याचा कोणताही पुरावा नाही, त्यामुळे करोनाबाधितांना त्यांच्या आजाराचे स्वरूप पाहिल्याशिवाय हे औषध देऊ नये, असा सल्ला जागितिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
करोनाबाबधितांमध्ये रेमडेसिवीरमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होते, लवकर प्रकृतीत सुधारणा होते, असे कोणतेही तथ्य या बाबत नेमलेल्या समितीला आढळले नाही. या औषधामुळे करोनाच्या सुरवातीच्या काळात उपयोग होत असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. त्यामुळे त्याची मागणी वाढली होती. त्याला या आवाहनामुळे पायबंद बसण्याची शक्यता आहे.
सध्या जगभरात करोनावर औषध म्हणून रेमडेसिवीरसह दोन औषधे वापरली जात आहेत. पण या औषधाच्या वापराने रुग्णालयातील वास्तव्यात कोणतीही घट झाल्याचे आढळून आले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही करोनाच्या काळात याच औषधांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे संसर्ग कमी काळात बरा होतो, असे मानण्यात येऊ लागले.
जागतिक संघटनेच्या या आवाहनाला या औषधाची उत्पादक कंपनी गिलीडने आव्हान दिले आहे. अनेक विश्वासार्ह राष्ट्रीय आरोग्य संघटनांनी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांवर या औषधाची शिफारस केली आहे, असे निवेदन गिलीडने प्रसिध्दीस दिले आहे.