शिल्लक डाळींचे लाभार्थींना लवकरच वितरण – छगन भुजबळ

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक डाळींच्या वाटपास केंद्राची आजच मंजुरी प्राप्त

मुंबई – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्र सरकारने आजच परवानगी दिली आहे. त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप केले नसल्याने त्या खराब झाल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर मंत्री भुजबळ यांनी खुलासा केला आहे.
भुजबळ म्हणाले, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत माहे एप्रिल ते नोव्हेंबर, 2020 या 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये केंद्राने 1,13,042 मे.टन डाळींचे नियतन दिले होते. त्यापैकी 1,06,600 मे.टन डाळींचे उपरोक्त 8 महिन्यांमध्ये वाटप करण्यात आहे. आजमितीस राज्य शासनाच्या गोदामांमध्ये व रास्त भाव दुकानांमध्ये एकूण 6,442 मे.टन डाळी शिल्लक आहेत.

केंद्र शासनाशी दिनांक 26/11/2020 रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपरोक्त 3 योजनांमध्ये काही प्रमाणात डाळी शिल्लक असून त्यांच्या वितरणाबाबत केंद्र शासनाचे धोरण कळविण्याबाबत विचारणा करण्यात आली होती.

परंतु, केंद्र शासनाने त्यांचे धोरण राज्य शासनास कळविले नाही. त्यामुळे राज्य शासनाने पुन्हा पत्रान्वये शिल्लक राहिलेल्या डाळींची आकडेवारी केंद्र शासनास कळविली असता केंद्र शासनाने आज, दि. 15 एप्रिल 2021 रोजी अन्न मंत्रालयाचे उपसंचालक संजय कौशिक यांच्या स्वाक्षरीने पत्रान्वये सदर शिल्लक डाळींचे वाटप राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना करण्याबाबत कळविले आहे.

एकंदरीत तुरडाळ व चणाडाळ यांचे वितरण शक्‍यतो लवकरात लवकर होणे आवश्‍यक असते. मात्र, केंद्र शासनाकडून शिल्लक डाळींच्या वितरणासंदर्भात धोरण कळविणे आवश्‍यक होते. सदर डाळीच्या वितरणासंदर्भातील धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाकडून आजच प्राप्त झालेला असल्याने त्यातील निर्देशास अनुसरून शिल्लक डाळीचे वितरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.